

आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गायकवाडने स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले; मात्र इतरांच्या मुलींना गर्भातच मारले. गर्भपात करण्यासाठीच कुटुंबापासून दूर चार दिवस कोल्हापुरात राहत होता, तर तीन दिवस मुंबईत कुटुंबाकडे जात होता. मोबाईलमध्ये रुग्णाची नावे टोपण नावाने आणि कोडवर्डचा वापर करून सेव्ह करत होता.
तीनशेहून अधिक स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉ. गायकवाडची पत्नी, मुलगा, मुलगी तिघेही डॉक्टर असून ते मुंबईला स्थायिक आहेत. त्यांना सुट्टी असणाऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवार व सोमवार तो कुटुंबासमवेत मुंबईत राहायचा, तर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तो कोल्हापुरात राहून गर्भलिंग निदान व गर्भपात करत होता. मळकटलेले साधे कपडे, जुनी मोटार घेऊन राहणीमान साधे भासविण्याचा प्रयत्न करत होता. रविवारी सायंकाळी गायकवाडला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले असता तो काहीही झालेले नाही, अशाच अविर्भावात होता. केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
विकृत मानसिकता
डॉ. चंद्रकांत गायकवाड याने स्वतःच्या कुटुंबाला मुंबईत ठेवले आहे. मुंबईत त्याचे दोन फ्लॅट असून, याच ठिकाणी त्याचे कुटुंब राहते. त्याची मुलगी एमबीबीएस डॉक्टर असून, ती एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे; मात्र इतरांच्या मुलींना गर्भातच मारण्याची विकृत मानसिकता गायकवाडची होती.
टोपण नावाने नंबर सेव्ह
डॉ. गायकवाड रुग्णाचे नंबर त्यांच्या टोपण नावावरून किंवा कोडवर्डमध्ये सेव्ह करत होता. सुरुवातीला रुग्णाच्या गावाचे नाव, रुग्णाचे निम्मे नाव आणि अपूर्ण आडनाव असा फॉर्म्युला त्याने नंबर सेव्ह करण्यासाठी वापरला होता.
भेटायलाही कोणी आले नाही...
डॉ. गायकवाडला शुक्रवारी अटक केली असून, रविवारी रात्रीपर्यंत त्याला भेटायला पत्नी, मुलगा किंवा मुलगी कोणीही आले नाही. एका लांबच्या नातेवाईकानेच अटक फॉर्मवर सह्या केल्या आहेत. गायकवाड कोल्हापुरात एकटाच राहत असल्यामुळे तो कोल्हापुरात काय करतो याची कल्पना कुटुंबाला होती काय, याचीही चौकशी सुरू आहे.
गवंडी, होमगार्ड डॉ. गायकवाडचे एजंट
डॉ. चंद्रकांत गायकवाडसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या रेखा वरुटे आणि सागर तराळ यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वरुटे होमगार्डसोबतच शहरातील विविध दवाखान्यांत आया म्हणून काम करत होती. तर गवंडी काम करणारा तराळ गायकवाडसाठी सीमाभागातील पेशंट पाठविण्याची जबाबदारी सांभाळत होता.
डॉ. गायकवाडच्या चौकशीत नाव समोर आलेल्या दोन एजंटना शनिवारी करवीर पोलिसांनी अटक केली. रेखा मधुकर वरुटे (वय ४५, रा. कळंबा, ता. करवीर), सागर अशोक तराळ (३३, रा. मांगूर, निपाणी) अशी त्यांची नावे असून, त्यांना रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना गुरुवार (६ ऑगस्ट) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोघांकडे दिवसभर चौकशी सुरू असून, काही दाम्पत्यांना डॉ. गायकवाडकडे पाठविल्याची कबुली दिली. या सर्वांना लवकरच चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे.
एकाच रिक्षातून पाच पेशंट
रेखा वरुटेने डॉ. गायकवाडकडे एकाच दिवशी पाच गर्भवती महिलांना उपचारासाठी पाठविले. या पाचही जणींना एकाच रिक्षातून दवाखान्यात पाठवल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे.