

कोल्हापूर : एखाद्या कवीने एखादे प्रेमगीत रचावे, एखाद्या गझलकाराने प्रेमावर गझल करावी किंवा एखाद्या साहित्यिकाने मुक्तछंदात प्रेमकविता लिहावी, असे प्रकार ही साहित्यातील सामान्य बाब आहे. ‘मराठी साहित्यात नऊ काव्यप्रकार आणि ते शृंगाररसाने ओथंबलेले असे मराठी साहित्य प्रथमच घडले आहे. प्राध्यापक, चित्रपट निर्माते आणि साहित्यिक म्हणून लौकिक असलेल्या ज्ञानेश वाकुडकर यांनी आपल्या अप्रतिम रचनांनी मराठी साहित्याला नवा साज चढवला आहे. चारोळी, मुक्तक, रुबाई, गझल, भावगीत, मुक्तछंद, प्रेमाचे अभंग, कव्वाली, लावणी... या नऊ काव्यप्रकारात त्यांनी शृंगाररस ओतला आहे. प्रेमवीरांच्या तरल भावनांना हळुवारपणे हात घालणार्या कविवर्य वाकुडकरांच्या शृंगारिक रचनांचा हा ‘नजराणा’ खास प्रेमदिनानिमित्त ‘पुढारी’च्या वाचकांसाठी.
जीवनाचे सार आहे
मी खुला व्यवहार आहे
का उगा जळतात काटे?
मी फुलांचा यार आहे!
जीवन जगण्याची माणसाची भावना ही प्रामाणिक असायला हवी. त्याचा अंतर्बाह्य व्यवहारही तो जसा आहे तसाच असायला हवा. अशावेळी काट्यांची पर्वा नको. फुलांच्या अर्थात प्रेमीजनांच्या सानिध्यात जीवनाचा मार्ग सुगंधित व्हावा, फुलारून यावा.
भावना व्यक्त करण्यासाठी कोणताही काव्यप्रकार चालू शकतो. प्रत्येक काव्यप्रकाराचे स्वत:चे एक अंगभूत वैशिष्ट्य असते. काव्यप्रकारातून प्रेमभावना ताकदीने व्यक्त करायची असेल तर आपली जीवनाबद्दलची अनुभूती गंभीर असायला हवी. जीवनावरही वेड्यासारखं प्रेम करता आलं पाहिजे. काव्यप्रकार नुसता शब्दबंबाळ असून चालत नाही. त्यात आशयघनता असायलाच हवी, असे सांगत कविवर्य प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी विविध काव्यप्रकारांत वेगवेगळ्या तर्हेने येणार्या शृंगारपूर्ण रचना दैनिक ‘पुढारी’कडे सादर केल्या.
कधी कधी चुकीने चारोळीची तुलना ‘हायकू’ या जपानी काव्यप्रकाराशीही केली जाते; पण चारोळी म्हणजे हायकू नव्हे, शेर नव्हे किंवा ‘रुबाई’ही नव्हे, असे सांगताना वाकुडकर म्हणतात - शेराच्या जवळपास जाण्याचा आभास निर्माण करणारी, पण प्रत्यक्षात अंतर राखून असलेली स्वयंपूर्ण सरळ, साधी आणि स्पष्ट अभिव्यक्ती असलेली चार ओळींची लघुत्तम कविता म्हणजे चारोळी होय. ही चारोळी अशी...
तुझ्या घरच्या आरशानं
कंटाळून आत्महत्या केली
कारण तुला पाहण्यातच
त्याची जवानी वाया गेली!
मुक्तकात येणारा शृंगार हा चारोळीपेक्षा वेगळ्या पद्धतीने येतो. चारोळी म्हणजे कुठेही, कशीही पथारी टाकणे तर मुक्तक म्हणजे दोन पानांची ओळीने मांडणी करणे. मनाचा वेध घेणारा मुक्तक प्रकार सादर करताना वाकुडकर म्हणतात..
किती दिशांनी आला वारा
शोधीत शोधीत माझे गाव,
कुणास ठाऊक किती फुलांच्या
ओठांवरती माझे नाव!
रुबाई हा चार ओळींचा तसा भन्नाट काव्यप्रकार. पहिल्या दोन ओळीत यमक, तिसरी ओळ विनायमकाची आणि चौथ्या ओळीत चमत्कृतीपूर्ण कलाटणीसह पुन्हा यमक, असे या प्रकाराचे बाह्यस्वरूप आहे. मूळ फारशी भाषेतून आलेला हा प्रकार उमर खय्यामच्या रुबायांचं भाषांतर करून माधव ज्युलियन यांनी मराठीत आणला. आकर्षक भाषाशैली आणि बेमालूम धक्कातंत्राचा सफाईदारपणे वापर करून कठिणातला कठीण विषय रुबाईतून अशा पद्धतीने रसिकांसमोर मांडला जातो की, बेहोषीत असल्याप्रमाणे रसिकांकडून दिलखुलासपणे ‘व्वा!’ म्हणून दाद मिळाल्याशिवाय राहात नाही अन् हेच रुबाईच्या यशस्वितेचं गमक आहे. इतर कवितांसारखी आज कविता ऐका अन् वाटलं तर पुढच्या आठवड्यात दाद द्या, असा उधारीचा प्रकार इथं चालत नाही, असे वाकुडकर सांगतात. मराठीत हा प्रकार पाहिजे त्या प्रमाणात हाताळलेला दिसत नाही. कारण हा प्रकार हाताळण्यासाठी सर्वात कठीण आहे!
जसे कोवळे रंग पानातले
जसे मोकळे श्वास रानातले,
तसे गाऊया मी म्हणालो; परंतु
तुझे वागणे संविधानातले!
गझलमध्ये एका शेराचा दुसर्या शेराशी संबंध असतोच असे नाही. हे सांगताना वाकुडकर म्हणतात - गझलेतील शृंगारात तरलता असते. अप्रत्यक्षपणे, आडवळणाने आशय व्यक्त करणे हे गझलचे वैशिष्ट्य आहे.
चेहरा चेहरा अन् पुन्हा चेहरा
हा नवा चेहरा, तो जुना चेहरा
कालचे ओठ का आज पुसतेस तू ?
ठेवतो का कधी त्या खुणा चेहरा?
विविध भावनांचे, विविध रंगांचे सरळसाधेपणाने आणि सहजतेने उलगडले जाणारे पदर म्हणजे भावगीत. या प्रकारात ओळीने भावनांचे थर असतात. फुलाची एका पाकळीमागून दुसरी पाकळी जशी उमलत जाते, तशा एका ओळीपाठोपाठ दुसर्या ओळी अर्थपूर्ण, सहजतेने उलगडत जातात. त्यात रुबाईसारखा भूलभुलय्या नसतो.
कोकिळेचे मंद गाणे, धुंद हे वेडे धुके
याक्षणी बोलू नको तू, प्रेम राहू दे मुके!
हसणे गालात आणि ओठ अर्धा चावणे
पापण्यांचे दार हलके खोलणे अन् लावणे
हाय वेड्या काळजाचा भाबडा ठोका चुके
या क्षणी बोलू नको तू.. प्रेम राहू दे मुके!
वार्याची एखादी झुळूक येते. पाने हलतात, फांद्या हलतात, फुलं पडतात अगदी सहजपणे. जिथं जमेल तिथं, झुळूक येईल तशी, अगदी तसाच भावनांचा पण कलात्मक आविष्कार म्हणजे मुक्तछंद. या मुक्तछंदातील काव्यप्रकारात मोहरून आलेल्या भावनांची मुक्त अभिव्यक्ती होते, असे ते म्हणतात.
भिरभिरणारी नजर
थरथरणारे ओठ
नजरानजर झाल्यावर
माती उकरणारे बोट
आणि तिच्या गालावरती
गुलाबाची साय असते
याहून वेगळं सांग दोस्ता,
प्रेम दुसरं काय असते?
वैयक्तिक भावनांना सार्वजनिक पातळीवर सामाजिक चेहरा देणारा कवितेचा बेधडक सरळसोपा पण अत्यंत प्रवाही प्रकार म्हणजे कव्वाली.
ताजमहालाची चर्चा कशाला करू?
साजणी मी तुझा चेहरा पाहिला
हसताना तुला पाहिले साजणी
चालता बोलता मोगरा पाहिला ॥धृ॥
सांग होऊ कसा ‘ताज’वरती फिदा
त्यास येईल का लाजण्याची अदा?
पत्थराची पूजा मी कशाला करू?
‘ताज’ माझा खरा लाजरा पाहिला ॥
रुबाईप्रमाणेच कव्वाली हा प्रकारही मराठीत फारसा कुणी हाताळलेला दिसत नाही.
लावणी म्हणजे खासगी भावनांचा उत्स्फूर्तपणे खळाळून वाहणारा धबधबा. त्यात शृंगार हा हटकून असतोच. शृंगाराशिवाय लावणी म्हणजे तिखटाविना ‘कोल्हापुरी मटण’ किंवा विदर्भातील ‘सावजी चिकन’ असेही वाकुडकर मिश्कीलपणे सांगतात.
थांबा ना, थांबा ना.. थांबा ना राया थांबा ना, असं काय करता, हात पुन्हा धरता,
उसंत घ्याया थांबा ना ॥
नवं नवथर न्हालेलं पाणी
पहिल्या धारेची फेसाळ ज्वानी
भरला रसाळ ओठांचा पेला
चवी चाखाना हलक्या ओठांनी
ज्वानीची साय बाई, सांडाया वेळ नाही जाईल वाया.. थांबा ना ॥
पावित्र्य आणि उदात्त भावनांचे प्रकटीकरण हा अभंगाचा स्थायीभाव. त्याग आणि विश्वात्मकता या गुणांबरोबरच भक्तिरसही अभंगात ओतप्रोत भरलेला असतो. मात्र कविवर्य वाकुडकरांनी भक्तिरसाला धक्का लागू न देता शृंगाररस द़ृग्गोचर करणार्या प्रेमाच्या अभंगाची रचना केली आहे.
येथे पाखरांनी । हवे तेव्हा यावे ॥
वसवावी गावे । आपापली ॥
हवे त्याने यावे । हवे तसे गावे ॥
हवे तेव्हा जावे । सोडोनिया ॥
वापरली फांदी । कोणी कोणी आधी ॥
उगा त्याची यादी ! मागू नये ॥
मला नाही भिंती । कोठली कवाडे ॥
सावलीचे भाडे । देऊ नका ॥
असा ज्ञानेश वाकुडकर यांच्या शृंगाराचा विविध काव्यप्रकारांच्या माध्यमातून झालेला सहज सोपा आणि तेवढाच अस्सल आविष्कार. वाकुडकरांच्या अनेक कविता रसिकांना तोंडपाठ असल्याने त्यांची कविता खर्या अर्थाने लोककविता झाली आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास...
मी व्यथांची वेधशाळा
मी नभिचा मेघ काळा
वाळवंटा ऐक माझे..
मी उद्याचा पावसाळा!
धक्कातंत्र हे ज्ञानेश वाकुडकर यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. त्याची अनेक उदाहरणं त्यांच्या कवितेत विखुरलेली आढळतात. गंमत करता करताच रसिकांच्या नकळत वाकुडकर भन्नाट काहीतरी सांगून जातात. कधी कडाडून दाद द्यायला भाग पाडतात.. तर कधी अंतर्मुख करून जातात!