

सुनील कदम
कोल्हापूर : डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे. कारण, शिवकुमार हे मागील तीन वर्षांपासून सातत्याने अलमट्टीची उंची वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अलमट्टी आणि महापूर!
२००५ साली अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आणि या धरणाच्या वाढत्या उंचीचे भयावह परिणाम सामोरे आले. २००५ साली सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे प्रचंड महापूर आला. २०१९ आणि २०२१ सालच्या महापुराने तर अलमट्टी आणि इथला महापूर यांचा परस्पर संबंध अधोरेखितच केला. त्यामुळे देशभरातील, राज्यातील आणि अनेक स्थानिक जलतज्ज्ञांनीही इथल्या महापुराला अलमट्टीचे बॅकवॉटरच कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष काढून तो राज्य शासनाला कळविला आहे.
शिवकुमारांचा आग्रह!
मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस राजवट आल्यापासून डी. के. शिवकुमार हे अलमट्टीच्या उंची वाढीसाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन उंची वाढीसाठी लागणारी जमीनही अधिगृहीत केली आहे. उंची वाढीसाठी लागणाऱ्या ७० हजार कोटी रुपयांची आगाऊ तरतूदही करून ठेवली आहे. धरणावरती स्किन प्लेटा बसविण्याची कल्पना त्यांचीच आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली या कामी दिल्ली दरबारी दोन बैठकाही पार पडल्या आहेत. अशा परिस्थितीत आता शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांचे प्रयत्न आता युद्ध पातळीवर सुरू होण्याची शक्यता दिसत आहे.
राज्यकर्त्यांची उदासीनता
अलमट्टीला मंजुरी मिळालेल्या १९६३ सालापासून ते २००५ सालापर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे आणि निष्काळजी पणामुळे अलमट्टीची उंची वेळोवेळी वाढत गेली आणि आता तर अलमट्टीची आणखी वाढू पाहणारी उंची कृष्णा-पंचगंगा काठावरील शेकडो गावांना कायमस्वरूपी बुडवायला कारणीभूत ठरणार आहे. २०१९ सालच्या महापुराच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी होती ५४६ मीटर आणि सांगलीतील आयर्विन पुलावरील पाणीपातळी होती ५४५ मीटर (समुद्र सपाटीपासून)! यावेळी या दोन्ही ठिकाणची प्रत्यक्षातील पाणीपातळी होती अनुक्रमे ५६.५ फूट आणि ५७.६ फूट! या एवढ्या पाणी पातळीच्यावेळी निम्मे कोल्हापूर आणि सांगली शहर पाण्याखाली गेले होते. याशिवाय कृष्णा, पंचगंगा आणि वारणा नदीकाठावरील शेकडो गावे जवळपास महिनाभर पाण्याखाली गेली होती. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती पार उद्ध्वस्त झाली होती.
तीव्र विरोध आवश्यक!
आता कर्नाटकने अलमट्टीची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याची सिध्दता केली आहे. तसे झाल्यास आणि पुन्हा महापूर आल्यास सांगलीतील पाणीपातळी होईल ७४ फूट आणि कोल्हापुरातील पाणीपातळी होईल ७२.९ फूट! अशी परिस्थिती निर्माण झाली, तर सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांचे अस्तित्व तरी राहील काय? कृष्णा-वारणा-पंचगंगा काठावरील छोट्या-मोठ्या गावांचे अस्तित्व तर अलमट्टीच्या डोहातच शोधावे लागेल. त्यामुळेच महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि या दोन जिल्ह्यांतील शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांनी वाढत्या उंचीला विरोध करण्याची आवश्यकता आहे.