

कोल्हापूर : मांगल्य, समृद्धी आणि वात्सल्याचा संदेश देणाऱ्या वसुबारसने गुरुवारी (दि. ५) दिवाळीच्या आनंदपर्वाला मंगलमय सुरुवात झाली. शहरातील पांजरपोळ, गोपालन केंद्रांसह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी गाय-वासरांचे पूजन करून सवत्स धेनूची आराधना करण्यात आली. हळद-कुंकू, फुलांच्या माळा, औक्षण आणि गोडधोडाच्या नैवेद्याने गोमातेचे पूजन करत दीपोत्सवाचे स्वागत पारंपरिक उत्साहात करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत गायीला मातेचे स्थान असून, गाय आणि वासराच्या नात्यातील माया, वात्सल्य आणि निरपेक्ष प्रेमाचा गौरव वसुबारसच्या निमित्ताने केला जातो. वर्षभर शेती, दुग्धव्यवसाय आणि मानवी जीवनाला आधार देणाऱ्या गोमातेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. यानिमित्ताने शहरातील पांजरपोळ आणि विविध गोपालन केंद्रांमध्ये गाय-वासरांना सजवून त्यांचे पूजन करण्यात आले. त्यांना फुलांच्या माळा घालून, हळद-कुंकू लावून औक्षण करण्यात आले. गोडधोडाचा नैवेद्य दाखवून गोमातेचे आशीर्वाद घेण्यात आले. ग्रामीण भागातही वसुबारसचा उत्साह अनुभवायला मिळाला. शेतकरी कुटुंबांनी गोठ्यातील गाय-वासरांचे पूजन केले.
घराघरांत लगबग वाढली
दरम्यान, वसुबारसने दिवाळीचा प्रारंभ झाल्याने घराघरांत उत्सवाची लगबग वाढली आहे. दारात तोरणे, अंगणात रांगोळ्या, घरांवर आकाशकंदील आणि पणत्यांची आरास करण्याची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्येही दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. फराळाच्या पदार्थांचा दरवळ आणि दिव्यांच्या प्रकाशाने पुढील काही दिवस वातावरण दीपोत्सवाच्या आनंदाने उजळून निघणार आहे.