

अनिल देशमुख
कोल्हापूर : कोल्हापूरसाठी मंजूर झालेले जिल्हा रुग्णालय आता शेंडा पार्क परिसरातच होणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक सुमारे दहा एकर जागा निश्चित केली जात आहे. एकीकडे जागा अंतिम होत असतानाच, दुसरीकडे या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक ५९४ नवी पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली. या पदांसह या प्रकल्पासाठीच्या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय उभारणीला आता वेग येणार आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने ‘प्रगती’ (प्रगत प्रशासन आणि सहज सुलभ तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे प्राथमिक आरोग्य सेवेची नवी संकल्पना) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. सन २०२६ ते २०३१ या ५ वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ४,२५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीपैकी ७० टक्के निधी म्हणजे २ हजार ९७५ कोटींचा निधी आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरूपात तर राज्य शासन आपला हिस्सा म्हणून १ हजार २७५ कोटींचा निधी देणार आहे. या निधीलाही राज्य शासनाने मंगळवारी मान्यता दिली.
या प्रकल्पांतर्गत कोल्हापूरसाठी ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. त्याची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या रुग्णालयासाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार शेंडा पार्क परिसरात सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सुपरस्पेशालिटी, कॅन्सर आदींसह एकूण ११०० खाटांचे रुग्णालयाजवळच हे नवे रुग्णालय उभारले जाणार आहे.
रुग्णालय उभारणीला येणार गती
जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक निधीला मान्यता देतानाच नव्या ५९४ पदांसाठी होणाऱ्या ३१ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चालाही राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय उभारणीला आता गती येणार असून या प्रकल्पा तर्गंत २०३१ पर्यंत हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत केले जाणार आहे.
राज्यातील पहिले कॅशलेस हॉस्पिटलही कोल्हापुरात उभारणार
कोल्हापुरात राज्यातील पहिले कॅशलेस हॉस्पिटलही उभारले जाणार आहे. येत्या दि.१५ डिसेंबरपर्यंत शेंडा पार्क येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इमारतीत हे हॉस्पिटल सुरू करण्याचे नियोजन असल्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महत्त्वाच्या सर्व शस्त्रक्रिया एकही रुपया न भरता केल्या जातील असे हे २०० खाटांचे रुग्णालय आहे. विविध योजनांद्वारे सर्व उपचार मोफत होणार असल्याने या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. एकीकडे उपचाराचा कोणताही खर्च नाही आणि दुसरीकडे सर्वोत्तम उपचार जिल्ह्यातील रुग्णांना या रुग्णालयामुळे मिळणार आहे.