Dog Bite Cases | कोल्हापूर जिल्ह्यात दररोज २५० जणांना श्वानदंश

वर्षभरात ९० हजार, तर यंदाच्या पाच महिन्यांतच ३८ हजार नागरिक जखमी
Dog Bite Cases |
Dog Bite Cases | कोल्हापूर जिल्ह्यात दररोज २५० जणांना श्वानदंश
Published on
Updated on

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ उपद्रवापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. जिल्ह्यात २०२५ या वर्षात तब्बल ९० हजार नागरिकांना श्वानदंश झाला, तर २०२६ मध्ये जानेवारी ते मे या अवघ्या पाच महिन्यांतच ३८ हजार १९१ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यात दररोज सरासरी २५० नागरिक श्वानदंशाचे बळी ठरत आहेत. शहरालगतच्या मोठ्या गावांमध्ये कुत्र्यांचा वाढता उपद्रव आहे. एवढी भयावह परिस्थिती असतानाही स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि संबंधित प्रशासन मात्र जबाबदारी झटकण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा अस्तित्वात नाही. जिल्हा परिषदेकडे निर्बीजीकरणासाठी निधी नसल्याचे कारण दिले जाते, तर ग्रामपंचायतींकडे आर्थिक क्षमता नसल्याचे सांगितले जाते. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा जबाबदारी झटकली जात आहे.

जिल्ह्यात सुमारे एक लाख भटके कुत्रे असल्याचा अंदाज आहे. एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणासाठी सुमारे १ हजार ८५० रुपये खर्च येतो. लाखभर कुत्र्यांचे निर्बीजीकरण करायचे झाल्यास १८ कोटी लागणार आहेत. मात्र निधीअभावी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात नाही. दुसरीकडे, कुत्र्यांचा गर्भधारणेचा कालावधी केवळ ६५ दिवसांचा असल्याने एका वर्षात तीन वेळा पिल्ले होण्याची शक्यता असते. प्रत्येक वेळी तीन ते चार पिल्लांचा जन्म होत असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ठिकठिकाणी पडणारा कचरा, चिकन दुकाने, रस्त्यावरील चिकन ६५च्या हातगाड्या आणि उघड्यावर फेकला जाणारा मांसाहारी कचरा यामुळे भटक्या कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणाबाहेर जात आहे. कचरा व्यवस्थापनातही स्थानिक स्वराज्य संस्थांची उदासीनता कायम आहे. रात्री कामावरून घरी परतणारे कर्मचारी, पहाटे फिरायला जाणारे नागरिक, शाळकरी मुले आणि दुचाकीस्वार हे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमुख बळी ठरत आहेत. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप रस्त्यावर धावून वाहनांचा पाठलाग करत असल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे.

निर्बीजीकरण आणि शेल्टर कधी?

सर्वोच्च न्यायालयानेही भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्बिजीकरण, लसीकरण आणि शेल्टर उभारण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.मात्र कोल्हापूर जिल्ह्यात या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे चित्र दिसत नाही. प्रस्ताव, बैठका आणि निधीच्या कारणांमध्ये वेळ घालवित असताना दुसरीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या आणि श्वानदंशाच्या घटना वाढतच आहेत.

श्वानदंशाचे धक्कादायक आकडे

२०२५ मध्ये श्वानदंशाचे रुग्ण : ९०,०००

जानेवारी ते मे २०२६ : ३८,१९१

दररोज सरासरी श्वानदंश : सुमारे २५०

जिल्ह्यातील भटकी कुत्री अंदाजे : १ लाख

एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणाचा खर्च : १,८५० रुपये

गर्भधारणेचा कालावधी : ६५ दिवस

एका वर्षात पिल्ले होण्याची शक्यता : ३ वेळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news