kolhapur | जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मिळणार मुदतवाढ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत १८ सहकारी संस्थांबाबत महत्त्वाचा निर्णय
kolhapur | जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मिळणार मुदतवाढ
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला आता मुदतवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुदत संपलेल्या आणि दुष्काळामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित असलेल्या ‘अ’ वर्गातील १८ सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश आहे. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या टप्प्यावर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर बँकेवर प्रशासक नियुक्त होणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ अ (३) मधील महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ मधील नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार मुदत संपलेल्या आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित असलेल्या १८ अ वर्ग सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त केला जाणार नाही.

या निर्णयाचा थेट लाभ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला होणार आहे. त्यामुळे बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळून निवडणूक होईपर्यंत कारभार सुरू ठेवता येणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक आता पुढील वर्षी होण्याची शक्यता असल्याने या निर्णयामुळे विद्यमान संचालकांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.