

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वारणानगर शाखेतील तीन कोटी 21 लाख रुपयांच्या अपहारातील मोठी रक्कम संशयित लिपिक मुकेश विलास पाटील (50, रा. मसूद माले, ता. पन्हाळा) याने दूध संस्थेत वळविल्याचा पोलिसांना संशय आहे. या उलाढालीतील व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी रविवारी सांगितले.
केडीसीसीच्या वारणानगर येथील शाखेत खातेदारांच्या बनावट सह्या करून तसेच बोगस खात्याच्या आधारे सुमारे 3 कोटी 21 लाख 91 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालातून उघडकीस आले.
जुलै 2021 ते ऑगस्ट 2024 या काळात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शाखाधिकारी तानाजी पोवार, लिपिक मुकेश पाटील, कॅशिअर शिवाजी पाटील, मीनाक्षी कांबळे, शरीफ मुल्ला यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
मुकेश पाटील याने बँकेत नोकरी करताना केलेल्या घोटाळ्यातील रक्कम त्याच्या दूध संस्थेत बेकायदेशीरपणे वळविल्याचा संशय आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. तपासकामी महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात येणार आहे, असेही पत्की यांनी सांगितले.