जिल्हा प्रशासन सात कलमी कार्यक्रम राबविणार

जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; आज विभाग प्रमुखांची बैठक
CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेले सात कलमी कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. याबाबत बुधवारी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडवणीस यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस यांनी सर्व अधिकार्‍यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला. प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली. याबाबत 15 एप्रिल रोजी आढावा घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज केली जाणार आहेत. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल, अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. यासह संकेतस्थळ सायबरद़ृष्ट्या सुरक्षित करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता केली जाणार आहे. अनावश्यक कागदपत्रे काढून टाकण्यात येणार असून, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित केली जाणार आहेत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील. अधिकार्‍यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसेल यासाठी सर्व अधिकार्‍यांना सूचना देण्यात येतील, असेही येडगे यांनी सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचवलेल्या सूचनानुसार जिल्ह्यात किमान दोन सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात प्रत्येक विभागाकडून राबविण्यात येतील. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न केला जाईल. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करण्याबाबत सर्व अधिकार्‍यांना सूचना दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. (इज ऑफ वर्किंग) यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे, त्यानुसार तसे नियोजन केले जात असल्याचे येडगे यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवरच प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका,जिल्हा स्तरावरच सोडवावेत. पण, असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही मुख्यमंत्री फडणीस यांनी या बैठकीत सांगितले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांना याबाबत सूचना देण्यात येणार असून नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे येडगे यांनी सांगितले.

विविध योजना, कार्यक्रमांना भेटी देणार

जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत. यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत, त्यानुसार जिल्ह्याचेही वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news