CPR Hospital | सीपीआरमध्ये केबीनवरून पुन्हा वाद पेटला; प्रशासनातील संषर्घ उफाळला

जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला ताबा; पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ यांनी लक्ष देण्याची मागणी
CPR Hospital |
सीपीआर येथील केबीनचा ताबा घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी कामकाज सुरू केले. ( छाया ः पप्पू अत्तार )
Published on
Updated on

कोल्हापूर : सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबीनवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. केबीनच्या डागडुजीनंतर वैद्यकीय अधीक्षक फलकावरून वातावरण तापले आहे. सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी संबंधित केबीनचा ताबा घेतला. त्यानंतर केबीनच्या एका दरवाजाला कुलूप लावल्याने प्रशासनातील संघर्षांला धार आली आहे.

सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सक केबीनवरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक दोघेही या केबीनवर दावा करत आहेत. सीपीआर सन 2006 रोजीच्या शासन निर्णायानुसार सर्व चल व अचल संपत्तीसह सर्वजनिक आरोग्य विभागाकडून छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे.

सीपीआरच्या हेरिटेज इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिल्हा शल्यचिकित्सकांची केबीन आहे. या इमारतीच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक केबीनच्या कामामुळे त्यांना अन्य ठिकाणी बसण्याची सोय केली आहे. केबीन सोडणार नाही, असा हट्ट जिल्हा शल्यचिकित्सकांनी धरला होता. पुन्हा काम झाल्यानंतर मूळ केबीन त्यांना देण्याची तोंडी चर्चा प्रशासनामध्ये झाली होती; पण अचानक या केबीनमध्ये वैद्यकीय अधीक्षक असा फलक लावण्यात आल्याने वादाला तोड फुटले. वारंवार उफाळून येणार्‍या वादामुळे प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

अधिष्ठातांच्या तीन केबीन

सीपीआर येथील नर्सिंग कॉलेज, शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठातांची दोन स्वतंत्र प्रशस्त केबीन आहे. आता पुन्हा हेरीटेज इमारतीतदेखील अधिष्ठातांच्या केबीनचे काम सुरू आहे.

केबीनला खडा पहारा

जिल्हा शल्यचिकित्सकांनी केबीनचा ताबा घेतल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी दरवाजाच्या कोयंड्याला कुलूप लावले. त्यामुळे वातावरण अधिक चिघळले आहे. रात्री केबीन उघडीच होती. येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात व अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी कार्यालयाबाहेर आपापली सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवली.

जिल्हा शल्यचिकित्सक सीपीआरमध्येच हवेत

ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त नागरिक व रुग्ण सीपीआर येथे येतात. जिल्हा शल्यचिकित्सकांचे कार्यालय सर्वांच्या द़ृष्टीने सोयीचे असल्याने सीपीआर येथेच ते असावे अशी रुग्ण, नातेवाईकांची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news