

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बॅरिकेडिंगवरून वाद झाला. पहाटे पाचच्या सुमारास अंबाबाईची उत्सवमूर्ती मंदिरात नेत असताना बॅरिकेडसजवळ पोलिसांनी अडवल्याने श्रीपूजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. श्रीपूजकांनी मंदिरातच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सुरक्षेच्या कारणास्तव अंबाबाई मंदिर आवारात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मात्र, या व्यवस्थेमुळे भाविकांसह श्रीपूजकांचीही गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला. सोमवारी पहाटे श्रीपूजकांना पोलिसांनी देवीच्या उत्सवमूर्तीलाच मंदिरात नेण्यापासून रोखल्याने गोंधळ निर्माण झाला. मंदिर परिसरातील छोट्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनाही बॅरिकेडिंगचा त्रास सहन करावा लागत असल्याचे श्रीपूजकांनी सांगितले. धार्मिक विधी पार पाडताना पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणेकडून अडथळे निर्माण होत असतील, तर नवरात्रौत्सवातील बॅरिकेडिंगच्या नियोजनावर फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
घोषणाबाजीसह ठिय्या
सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीपूजकांनी मंदिरात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले. हा वाद सुमारे दोन तास सुरू होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी किरण लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेत श्रीपूजकांची बाजू ऐकून घेतली. बॅरिकेडिंगबाबत योग्य ती कार्यवाही करून भाविकांची आणि श्रीपूजकांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.