

दिलीप भिसे
कोल्हापूर : वर्दीची झूल चढवून पोलिस दलातील सहकार्यांची आर्थिक पिळवणूक करणार्या प्रवृत्तीविरुद्ध पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट कोठडीचा रस्ता दाखविल्याने चिरीमिरी आणि हप्तेगिरीला सोकावलेल्या वर्दीतल्या बोक्यांची दाणादाण उडाली आहे. मुख्यालयातील आलिशान केबिनमधून मिजास ठोकणार्या आणि बेधडक खिसे कापणार्या खंडणीखोरांविरुद्ध आता असंतोष खदखदू लागला आहे. काळेधंदेवाल्यांशी साटेलोटे आणि वरिष्ठांभोवती पिंगा घालणार्या पंटर्सच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे.
बदलीसाठी खंडणी उकळणार्या रॅकेटचा भांडाफोड झाल्यामुळे विनासायास कमाईला सोकावलेल्या मंडळींची पाचावर धारण बसली आहे. कारवाईच्या बडग्यामुळे रात्र-दिवस पोलिस ठाण्यांच्या वळचणीला पडलेले पंटर्स आठवड्यापासून गायब झाल्याचे चित्र आहे.
बदल्या, नियुक्त्यांसह शिस्तभंग, खातेनिहाय चौकशी, कर्मचार्यांवरील कारवाईची फाईल टेबलावर येताच संबंधितांना भीती घालून संबंधितांची आर्थिक पिळवणूक करणारा विभाग, असेच समीकरण बनले आहे. या शाखेतील वादग्रस्त कारभाराबाबत उलटसुलट चर्चा होती. मात्र, कोणीही उघड बोलत नव्हते. त्याचाच फायदा घेत काही मंडळींकडून बेधडक गैरप्रकार चालू होते. बदलीसाठी कर्मचारी व अधिकार्यांकडूनही खंडणी वसुलीचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. चंदगड येथील पोलिस कर्मचार्याने आस्थापना शाखेतील खंडणीचा भांडाफोड करून लक्ष वेधले. आंतरजिल्हा असो अथवा विनंती अर्जावर पोलिस अधीक्षक निर्णय घेतात. या प्रक्रियेशी लिपिकाचा कोठेही संबंध नसतो. केवळ वरिष्ठांच्या आदेशाचा अंमल एवढीच त्याची जबाबदारी, तरीही बदलीसाठी आर्थिक लुबाडणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी आस्थापना विभागातील खंडणी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शहर उपअधीक्षक अजित टिके यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. टिके यांनी लिपिक संतोष पानकरला अटक करून चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. चौकशीत धक्कादायक माहितीही चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांची पिळवणूक करणार्यांची माहिती नागरिकांनी हेल्पलाईनवरून द्यावी, असे आवाहनही पोलिस अधीक्षकांनी केले आहे.