कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी डावलण्याच्या प्रकारामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांत प्रचंड उद्रेक निर्माण झाला. अनेक प्रभागांतील पदाधिकारी कार्यकत्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. तर महिला पदाधिदकार्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. गजानन महाराजनगर येथील भाजपच्या शाखाफलक वाजत गाजत भाजप कार्यालयात जमा करण्यात येणार आहे.
शिस्तीचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये निष्ठावंत आणि उपरा अशी दरी निर्माण झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पदाधिकार्यांनी पक्षावर कब्जा केल्याचा आरोप संतप्त पदाधिकार्यांनी केला. भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीची जागा वाटपाचे नियोजन जाहीर होताच भाजप पदाधिकारी आणि इच्छुकांमध्ये उद्रेक उफाळून आला. महापालिका उमेदवारीसाठी नेते पदाधिकार्यांनी आपल्या आप्तस्वकियांसह मर्जीतल्या लोकांना सांभाळायचे, मग आम्ही काय ‘मन की बात’ ‘भाजपच्या योजना सांगत फिरायचे काय’?असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. प्रभाग चौदामधून धनश्री तोडकर यांनी जय्यत तरायी केली होती. मात्र त्यांना डावलून उपर्या उमेदवारास उमेदवारी दिल्याचा आरोप करून तोडकर यांनी भाजप कार्यालयासमोर मंगळवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
आम्ही किती अन्याय सहन करायचा, या निवडणुकीत नेत्यांचे डोके किंवा गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गणेश देसाई यांनी दिला. तर मंगला निपाणीकर, कविता लाड, गणेश देसाई, रविकिरण गवळी यांच्यासह अनेकांनी मंगळवारी विविध प्रभागांतून पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. गजानन महाराज नगर येथील भाजपचा फलक कटरने तोडून वाजतगाजत भाजप कार्यालयात जमा करणार असल्याचे सांगितले.
खासदार महाडिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली. विजय जाधव, राहुल चिकोडे यांनी स्वत:साठी व कुटुंबातील व्यक्तींसाठी उमेदवारी घेतली. मग बूथलेव्हलपर्यंत पक्षासाठी राबणार्या पदाधिकार्यांचा विचार कोणी केला का? अशी संतप्त भावना अनेकांनी व्यक्त केली. आमदार अमल महाडिक यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात पदाधिकार्यांना संधी का दिली नाही, असा सवालही कार्यकर्त्यांनी केला.