

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील कानसा नदीवर बांधण्यात आलेला कांडवण लघु पाटबंधारे प्रकल्प बुधवारी (दि.१८) सायंकाळी ४.३० वाजता पूर्ण क्षमतेने (१००%) भरला. यानंतर प्रकल्पाच्या सांडव्यावरून कानसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कानसा खोऱ्यातील विरळे, जांबूर, मालगांव कांडवण, पळसवडे, मालेवाडी, सोडोली या गावांच्या पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची गरज भागवण्यासाठी कानसा नदीवर हा ०.२५ टीएमसी क्षमतेचा लघु पाटबंधारे तलाव बांधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
सध्य स्थितीत, तलावाच्या सांडव्यावरून प्रतिसेकंद २२५ घनफूट (क्युसेक्स) इतका विसर्ग कानसा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. परिसरात पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास, सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, वारणा पाटबंधारे विभागाने कानसा नदीच्या काठावर वसलेल्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.