School Safety Training | सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

क्यूआर कोड, कथाकथनाच्या पुस्तिकेतून घडवणार आपत्तीदूत
School Safety Training |
School Safety Training | सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
Published on: 
Updated on: 

अनिल देशमुख

कोल्हापूर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आपत्तीच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळावे, त्यातून कोणत्याही आपत्तीला सामोरे जाणारी पिढी घडावी, याकरीता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. याकरीता राज्य शासनाने पुस्तिका तयार केली आहे. त्या पुस्तिकेतील क्यूआर कोड, रंजक पद्धतीने मांडलेल्या कथा यांच्या मदतीने आपत्तीविषयक माहिती आणि त्यावरील उपाय योजना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवल्या जाणार आहेत. या उपक्रमातून ‘आपत्तीदूत’ निर्माण करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या, रंजक आणि कथाकथन पद्धतीने देणारी विशेष पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यातील मजकूर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रमाणित करून घेतला जाणार आहे. ही पुस्तिका केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता, त्यांच्या माध्यमातून कुटुंबात आणि समाजातही आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.

पुस्तिकेची ही असतील वैशिष्ट्ये

विद्यार्थ्यांचे वय आणि आकलन क्षमता लक्षात घेऊन ही पुस्तिका आकर्षक आणि सर्वसमावेशक स्वरूपात तयार केली जाणार आहे

रंजक मांडणी व कार्टून पात्र-आपत्ती व्यवस्थापनाच्या संकल्पना सहज व मनोरंजक पद्धतीने समजावण्यासाठी कथाकथन शैलीचा. विद्यार्थ्यांना विषय आपलासा वाटावा यासाठी एक विशेष कार्टून पात्र विकसित केले जाईल.

३० ते ४० आपत्तींचा समावेश-विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सविस्तर आढावा यामध्ये असेल. विषय इंग्रजी वर्णमालेच्या अक्षरक्रमानुसार मांडले जातील; उदाहरणार्थ ‘सी’ अंतर्गत क्लाऊड बस्ट (ढगफुटी), क्लाऊड वेव्ह (थंडीची लाट). प्रत्येक आपत्तीची माहिती २०० ते ४५० शब्दांत असेल.

टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन-आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील उपाययोजना आणि आपत्तीनंतरची पुनर्बांधणी या तिन्ही टप्प्यांवर सविस्तर माहिती दिली जाईल. सोबतच ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याचे स्पष्ट मार्गदर्शन असेल.

क्यूआर कोड व ऑडिओ-व्हिज्युअल सुविधा

संबंधित आपत्तींची छायाचित्रे आणि इन्फोग्राफिक्स पाहण्यासाठी पुस्तिकेत क्यूआर कोड असतील. पुस्तकाच्या प्रस्तावना पृष्ठावर संपूर्ण पुस्तकाचा सारांश सांगणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाचा क्यूआर कोड असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.