कोल्हापूर : बाजार समितीच्या प्रत्येक कामात तू आडवा पडतोस, कामे बंद पाडण्याची धमकी देतोस, समिती काय तुझ्या बा ची हाय काय.. अशा शब्दांत एका माजी सभापती असणार्या संचालकाने दुसर्या संचालकाला सुनावले. यावर संबंधित संचालकाने माजी सभापती असलेल्या संचालकास बाहेर निघालोय.. आठ दिवसांनी परत आल्यानंतर तुला सोडत नाही.. तुझा गेमच करतो.. अशा शब्दांत धमकी दिल्याने संचालक मंडळाच्या बैठकीत एकच खळबळ उडाली.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी मासिक सभा झाली. सभेमध्ये समितीच्या आवाराची साफसफाई करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. सफाईसाठी आलेल्या मुलांना कांदा-बटाटा विभागात एका संचालकाने सफाईवरून तुमचा ट्रॅक्टर बंद करतो सुनावले. सफाई करणारी मुले तालुक्यातील असल्याने संबंधित संचालकाने याचा जाब शुक्रवारच्या बैठकीत विचारला. यावरून दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली.
तुला वरून खाली फेकीन...
बैठकीमध्ये दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. गळपट धरण्याचा प्रकार घडला. अर्वाच्यभाषेत शिवीगाळ करण्यात आली. यावेळी एका संचालकाने तुला वरून खाली फेकीन, तुझं तुझ्या गावात फिरायचं अवघड करीन, अशा धमक्या दिल्याचे समजते.
माजी सभापती दारात जाऊन थांबले
माजी सभापती बैठकीनंतर धमकी दिलेल्या संचालकाच्या समितीमधील मिळकतीच्या समोर काहीकाळ थांबले. काही संचालकांनी त्यांना येथे थांबू नका, वाद आणखी वाढेल, असे सांगत समजूत काढली. त्यानंतर माजी सभापती तेथून निघून गेले.
गंभीर प्रकार, नेते दखल घेणार का?
संचालक मंडळाच्या बैठकीत बघून घेण्याची भाषा वापरणे, शिवीगाळ करणे हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे या वादाची, अरेरावीची नेते कशा पद्धतीने दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.