

कोल्हापूर : आशिष शिंदे
ऑनलाईन विश्वात दररोज तासन्तास वावरण्याची सवय तरुणाईच्या दिनक्रमाचा भागच बनली आहे. मोबाईल, सोशल मीडिया, गेमिंग, सीरिजमुळे प्रत्येकाचा स्क्रीन टाईम दिवसागणिक वाढत चालला आहे. लाईक्स, कमेंटस्, शेअर आणि रिमिक्समध्ये वरचढ राहण्याचा नाद थेट मानसिक आरोग्यावर घाला घालत आहे. परिणामी, मेंदूवर ताण येतो आणि डोपामिन, सेरोटोनिन आणि कोर्टिसोल हार्मोन्सचे संतुलन बिघडते. याच डिजिटल स्ट्रेसमुळे तरुणाईच्या डोक्यात ‘केमिकल लोचा’ होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. सोशल मीडियावर फेमस होत चालल्यानंतर मेंदूमध्ये डोपामिन नावाचे रिवॉर्ड हार्मोन स्रावते. यामुळे व्यक्तीला आनंद, समाधान आणि मी महत्त्वाचा आहे अशी भावना निर्माण होते. वेळोवेळी हा रिवॉर्ड लूप व्यसनासारखा बनतो आणि लाईक्स, फॉलोअर्स न मिळाल्यास अस्वस्थता, चिडचिड आणि राग वाढतो. हा राग अनियंत्रित होतो आणि वाद हिंसाचारात बदलतो.
हार्मोन्सवर होतो परिणाम
डिजिटल ताण आला की मेंदू सतत कॉर्टिसोल स्रवायला लावतो. सुरुवातीला यामुळे एकाग्रता वाढते, पण सतत पातळी वाढलेली राहिली तर झोपेचा र्हिदम, रोगप्रतिकारशक्ती आणि चयापचय बिघडतो. परिणाम थकवा, चिडचिड, वजनात चढ-उतार. सोशल मीडियावरील लाईक्स आणि प्रतिसादामुळे डोपामिन झपाट्याने वाढते. वारंवार उत्तेजना मिळाल्याने मेंदू त्या उत्तेजनेवर अवलंबून होतो. ती न मिळाल्यास चिडचिड, नैराश्य आणि एकाग्रतेचा अभाव वाढतो.
डिजिटल स्ट्रेस म्हणजे काय?
मोबाईल, लॅपटॉप आणि सततच्या नोटिफिकेशन्समुळे मेंदू सतत अलर्ट स्थितीत राहतो, यालाच डिजिटल स्ट्रेस म्हणतात. या सततच्या उत्तेजनामुळे मेंदू कॉर्टिसोल, अॅड्रेनालिन आणि डोपामिन या हार्मोन्सचे अधिक स्राव करतो. त्यामुळे झोपेचा र्हिदम बिघडतो, एकाग्रता कमी होते, चिडचिड, अस्वस्थता, वैफल्य, लक्ष विचलित होणे, कामात टाळाटाळ, डोळे दुखणे किंवा जळजळ, मान - कंबर - पाठीवर ताण, थकवा, पचनाशी संबंधित त्रास, सोशल मीडिया वारंवार चेक करणे, सतत नोटिफिकेशन्स पाहणे, दीर्घ वेळ स्क्रीनसमोर बसणे, स्मरणशक्तीवर परिणाम, चुका वाढणे अशी लक्षणे दिसू लागतात.
डिजिटल स्ट्रेसला कारणीभूत
मोबाईल, लॅपटॉपवर तासन्तास शॉर्ट व्हिडीओज, सीरिज पाहणे, ई-मेल, चॅट, गेमिंग, नेहमी ऑनलाईन राहण्याची अपेक्षा, नोटिफिकेशनचा मारा, माहितीचा ओव्हरलोड, अनेक अॅप्सचा वापर.