

दिलीप भिसे
कोल्हापूर : सायबर भामट्यांनी जानेवारी ते मे 2025 या काळात विविध आमिषे आणि डिजिटल अरेस्टची भीती घालून 25 कोटींपेक्षा अधिक रकमेवर डल्ला मारला आहे. जिल्ह्यात पाच महिन्यांत ऑनलाईन फसवणुकीच्या दोन हजारांवर तक्रारी दाखल झाल्या आहेत. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर दाखल झालेली आकडेवारी धक्कादायक आहे. पोर्टलवरील तक्रारींनुसार, सुमारे 1 कोटी 75 लाखांच्या रकमा गोठविण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
सम—ाटनगर येथील निवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना डिजिटल अरेस्टची भीती घालून 3 कोटी 57 लाखांना गंडा घातला. याचा छडा लागण्यापूर्वीच निवृत्त अभियंता दत्तात्रय पाडेकर (वय 75) यांना 7 कोटी 86 लाखांना गंडविले. दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा गुन्हा दाखल करून डिजिटल अटकेची भीती घातली. पाडेकर यांची आर्थिक उलाढाल आणि बँक खात्यांवरील स्टेटमेंटची सायबर चोरट्यांना परफेक्ट माहिती कशी मिळाली, हा कळीचा मुद्दा आहे. याचाच अर्थ स्थानिक टीप देणारा भामट्यांच्या संपर्कात असावा का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. भामट्यांच्या हालचालींचा संशय आल्यानंतर डोंगरे यांच्याबाबत झालेल्या फसवणुकीची चोरट्यांना पाडेकर यांनी माहिती दिली. बातम्यांची कात्रणे व्हॉटस्अॅपवर पाठविली. राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना व्हिडीओ पाठविला. त्यानंतरही भामट्यांनी धमकी सत्र चालूच ठेवले. भामट्यांनी पाडेकर यांच्याकडून 4 कोटींची रक्कम उकळली.
वयोवृद्ध आणि महिलांना डिजिटल ऑनलाईन फसवण्याचे प्रमाण अधिक आहे. मुंबईतील रिअल इस्टेट व्यावसायिक सुकेत मोदी नामक व्यक्तीला डिजिटल अरेस्टमध्ये फसवले होते. दोन दिवसांहून अधिककाळ त्यांना घरात डिजिटल अरेस्ट केले होते. त्यांच्या नावाने पासपोर्ट आणि ड्रग्जचे पार्सल पाठवत असल्याचे सांगून त्यांना भीती घातली. त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन 35 लाख रुपये वळविण्यात आले. गोरेगाव येथील वयोवृद्ध दाम्पत्याला 1 कोटी 33 लाख रुपये, तर गतवर्षी ऑगस्टमध्ये खार पश्चिम येथील बड्या व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची भीती घालून भामट्यांनी 2 कोटींची रक्कम उकळली होती.
डिजिटल अरेस्ट हा ऑनलाईन फसवणुकीचा नवीन प्रकार आहे. अलीकडच्या काळात शासकीय, निमशासकीय उच्चपदस्थ पदावरून निवृत्त झालेल्यांना टार्गेट करून त्यांच्या आर्थिक उलाढालीची माहिती घेतली जाते. पोलिस अधिकारी अथवा इतर प्रशासकीय अधिकारी असल्याचे भासवून मोबाईल कॉलद्वारे संपर्क साधून चौकशी केली जाते. कॉल केलेल्या व्यक्तीला तुमच्यावर एखादा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही अपराध केला आहे, असे सांगितले जाते. संबंधित व्यक्ती घाबरते. त्यानंतर बनावट अधिकारी व्हॉटस्अॅप कॉलवरून संवाद साधतात. संबंधितांना खोट्या गुन्ह्याची माहिती दिली जाते. तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात, असे सांगितले जाते. कॅमेर्यासमोरून कोठेही जाऊ नका, चौकशी करून तुमचा जबाब नोंदविला जातोय, असे सांगितले जाते. महत्त्वाचे म्हणजे, कॉल करणारी व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात असते. बनावट सरकारी कागदपत्रे, सरकारी कार्यालयही दाखविले जाते. या प्रकाराला घाबरून निष्पाप मंडळी बळी पडतात आणि फसतात.