

कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक लढवणार्या उमेदवारांची यादी शुक्रवारच्या माघारीच्या प्रक्रियेनंतर अंतिम झाली. शनिवारी त्यांना चिन्ह वाटप होईल. त्यानंतर निवडणुकीसाठी मतपत्रिका छपाई, त्यानुसार ईव्हीएम तयार करण्याची प्रक्रिया केली जाईल. एका प्रभागातील अ, ब, क, ड आणि एका प्रभागात अ, ब, क, ड व ई अशा गटांतील सर्व उमेदवारांसाठी एकच ईव्हीएम मशिन राहणार आहे. यामुळे मतदान करण्यासाठी मतदारांना प्रत्येक गटाचे उमेदवार ओळखण्यासाठी गटनिहाय वेगळा रंग निश्चित करण्यात आला आहे.
प्रशासनासह उमेदवारांनाही द्यावे लागणार धडे
मतदान प्रक्रिया कशी असेल, याचे धडे प्रशासनासह उमेदवारांनाही द्यावे लागणार आहेत. त्यानुसार अनेकांनी प्रक्रियाही सुरू केली आहे. चिन्ह मिळताच त्याला अजून वेग येणार आहे. ही प्रक्रिया नीटपणे समजली नाही, तर मतदान प्रक्रियेला काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्र. 1 ते 19 मध्ये प्रत्येक प्रभागातील गटनिहाय रंग
अ गटातील उमेदवारासाठी ईव्हीएमवर पांढरा रंग. ‘ब’ गटातील उमेदवारांची नावे आणि चिन्हे ही फिक्का गुलाबी रंग. ‘क’ गटातील उमेदवारांसाठी फिक्का पिवळा. ‘ड’ गटातील उमेदवारांसाठी फिक्का निळा रंग असेल. प्रभाग क्रमांक 20 मध्ये अ ते ड गटांना वरीलप्रमाणेच रंग असतील, तर ई गटाला फिक्का हिरवा हा रंग राहणार आहे.
मतदाराला देता येणार चार मते; 20 व्या प्रभागात पाच मतांचा अधिकार
प्रभाग क्रमांक 1 ते 19 मध्ये प्रत्येक मतदाराला प्रत्येकी चार मते देता येणार आहेत, तर 20 व्या प्रभागात मात्र मतदारांना पाच मतांचा अधिकार असेल. मतदाराला चार किंवा पाच मतांचा अधिकार असला, तरी एका गटातील एकाच उमेदवाराला मत देता येणार आहे. एकाच गटात एकापेक्षा जादा मत देता येणार नाही. तसेच त्या ईव्हीएमवरील जितके गट असतील, तितकी मते द्यावी लागतील, अन्यथा मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. एकाद्या मतदाराने चार मते द्यायची असतानाही एक, दोन किंवा तीनच मते दिली, तर त्याला प्रक्रिया समजून सांगत चार मते द्यावी लागणार आहेत, तरीही मतदाराने केवळ एक, दोन किंवा तीनच मते दिली, तर त्या मतदानावर कव्हर घालून, केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधींना बोलावून घेतील. त्यानंतर ईव्हीएमवरील काळे बटण काढून मतदान प्रक्रिया समाप्त केली जाणार आहे.