कोल्हापूर : कोल्हापुरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व ताकदवार नेते एकत्र असल्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व दहा जागा निवडून येतील. त्यामुळे महाविकास आघाडीचा स्कोअर शून्य राहील, असा विश्वास खा. धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना केला. आमचा संघर्ष विकासासाठी असतो आणि माजी पालकमंत्र्यांचा संघर्ष हा सत्ता लाटण्यासाठी असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
खा. धनंजय महाडिक यांनी माकेंट यार्डमधील मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, सत्तेतून भ—ष्टाचार करायचा आणि या भ—ष्ट पैशातून पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी माजी पालकमंत्र्याचा संघर्ष असतो. आम्ही फक्त विकासकामे लोकांसमोर घेऊन जात असतो. अमल महाडिक हे संयमी नेतृत्व मानले जाते. त्यांनी दक्षिणध्ये विकास कामे केली आहेत. प्रत्येकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. याऊलट आ. ऋतुराज पाटील निवडणूक झाल्यापासून गायब झाले आहेत. पाच वर्षे लोकांमध्ये कधी गेले नाहीत. मतदारसंघात फिरकले नाहीत. विकासकामे केली नाहीत. त्यांनी विकासकामांचे जे फलक लावले त्यामध्ये केंद्र सरकराच्या योजना विशेषत: राष्ट्रीय महामार्गाचे काम, जलजीवन मिशनमधील कामे आपणच केली असे फलक लावले. त्यामुळे लेाकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. विकासकामांचे लावलेले फलक त्यांच्याच अंगलट आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमधील निवडणूक एकतर्फी होईल व अमल महाडिक 50 हजार मतांनी विजयी होतील, अशी परिस्थिती आहे. असेही खा. महाडिक यांनी सांगितले. महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात प्रचंड विकासकामे झाली. रद्द झालेले, रखडलेले, स्थगित झालेले अनेक प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित पवार यांनी हे प्रकल्प मार्गी लावले. लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण यामुळे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येईल, असे ते म्हणाले.