

कोल्हापूर : आमच्या विरोधकांनी दोन बस आणल्यावर मोठा गाजावाजा केला; पण आम्ही शंभर इलेक्ट्रिक बसेस आणल्या. त्यातही विरोधकांनी १०० बसेस येणार नाहीत. या हवेतल्या गोष्टी आहेत, असा अपप्रचार केला; परंतु आता लवकरच त्या बसेसचे उद्घाटन करणार आहोत, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तिपीठ महामार्ग झाल्यावर अमर्याद विकास होईल. गोकुळची लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच हाेऊन महायुती २५ जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खा. महाडिक म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकार कोल्हापूरसाठी भरघोस निधी देत असल्याने विकासाला गती आली आहे. उडाण योजनेंतर्गत कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाल्याने २७४ कोटी निधी मिळाला. आता २३०० मीटरने धावपट्टी वाढल्यावर येथे मोठी विमानेही उतरतील. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत ३,४०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पंचगंगा पुनरुज्जीवन, पूर नियंत्रण यासाठीही भरघोस निधी मिळाला आहे. आय. टी. पार्क झाल्यानंतर येथेच तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होतील.
गोकुळ हे शेतकऱ्यांसाठी कामधेनू आहे. गोकुळच्या अर्थकारणातून पैसा उपलब्ध होत असल्यानेच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. गोकुळ निवडणुकीच्या बाबतीत तर्कवितर्क लढविले जात आहेत; परंतु गोकुळची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल. यात महायुती २५ आणि महाविकास आघाडी शून्य असा स्कोअर राहील, असा विश्वासही खा. महाडिक यांनी व्यक्त केला.
राजकीय टोलेबाजी रंगली नाही...
युवाशक्तीची दहीहंडी आणि राजकीय टोलेबाजी असे समीकरण गेल्या काही वर्षांत झाले आहे. यंदा तर गोकुळच्या निवडणुकीने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आ. महादेवराव महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, माजी खा. संजय मंडलिक, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, आ. अशोकराव माने आदी व्यासपीठावर असल्याने टोलेबाजी रंगणार अशी अपेक्षा होती; परंतु मंत्री मुश्रीफ यांच्यासह सर्वजण कार्यक्रमाला उपस्थिती लावून भाषण न करता गेल्याने यंदा राजकीय टालेबाजी रंगली नाही.