कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेबाबत माझ्या विधानाचा विपर्यास करणार्या आणि छत्रपती घराण्याच्या सुनेचा अपमान करणार्या आ. सतेज पाटील यांनी माफी मागितली का? असा खडा सवाल भाजपचे खा. धनंजय महाडिक यांनी केला. महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके आणि अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित युवाशक्ती मेळाव्यात ते बोलत होते. दसरा चौक येथे हा कार्यक्रम झाला.
खा. महाडिक म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने केवळ स्थगिती देण्याचे आणि घोटाळे करण्याचे काम केले. महायुती सरकारने सर्व घटकांसाठी योजना राबविल्या. वारंवार हिंदूंचा अपमान करणार्या राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांसमोर हात जोडले नाहीत. शाहू महाराज यांच्या सुनेचा अर्वाच्य भाषेत अपमान केला. महिलांना ताकद दाखविण्याची भाषा केली. बंटी पाटलांनी माफी मागितली नाही. त्यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने प्रतिक्रिया दिली नाही.
कृष्णराज महाडिक यांनी आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात कुठल्याही जिल्ह्यात या कोणाकडे किती लोक येतात हे पाहू, असे थेट आव्हान दिले. राजेश क्षीरसागर, सत्यजित जाधव, देवराज नरके, विपूल भंडारे, महेंद्र चव्हाण यांची भाषणे झाली. माजी आमदार (कै.) चंद्रकांत जाधव यांनी तयार केलेल्या शाहू मिल प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मेळाव्यास शिवसेना निरीक्षक उदय सावंत, विश्वराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक, ऋतुराज क्षीरसागर, माजी महापौर सरिता मोरे, संजय निकम, बाबा पार्टे, राजसिंह शेळके, किरण नकाते, किरण शिराळे, नंदकुमार मोरे, संजय वास्कर यांसह युवक उपस्थित होते. पूनम चौगले यांनी सूत्रसंचालन केले.
खा. महाडिक म्हणाले, महाडिक परिवाराने नेहमीच महिलांचा सन्मान केला. कोल्हापुरात पहिली महिला महापौर महाडिक परिवाराने केली. त्यामुळे बंटी पाटील यांनी महिला सन्मानाबद्दल महाडिकांना बोलू नये. माझ्या भाषणाचा विपर्यास करून महाडिकांनी महिलांचा बंदोबस्त करतो म्हटले, असा अपप्रचार करण्यात आला.