

Kolhapur Dhamani Dam
म्हासुर्ली: तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धामणी नदीवरील बंधाऱ्यात पाटबंधारे विभागाने शाश्वत स्वरूपात पाणी अडवले आहे. यंदाच्या पावसाळ्यात धामणी मध्यम प्रकल्पात प्रथमच दीड टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उन्हाळ्यात गरजेनुसार यातून पाणी पुरवले जाईल आणि वर्षानुवर्षे पाण्यासाठी आसुसलेल्या शेतजमिनीचेही पांग फिटेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मातीचे बंधारे घालण्याची जी धामधूम चालत होती, ती कायमस्वरूपी थांबली आहे. मातीबंधाऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च कुठेतरी थांबला आहे. हाच धामणीच्या विकासपर्वाचा श्रीगणेशा आहे.
धामणी खोरे जिल्ह्यातील बहुदा एकमेव परिसर जिथे नदीतील पाणी अडवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःहून नदीवर मातीबंधारे घालावे लागत होते. या बंधाऱ्यांत नदीपात्र तुडुंब भरत होते. मात्र भरलेल्या नदीपात्रातील पाणी किती दिवस पुरेल याची शास्वती नसे. जसजसा शेतीचा पाणी उपसा वाढेल तसे झपाट्याने पात्र खालावत होते. उन्हाळ्याच्या मध्यावरच कोरडे पडून पुढील दोन महिन्यांसाठी आपले विक्राळ रूप दाखवत होते. मोठ्या मेहणतीतून उभी केलेली पिके मान टाकत होती, तर गुराढोरांना पाणी मिळणेही दुरापास्त होत होते. उत्पादनावरील खर्च, मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ कधी बसत नव्हता. येथील शेतकरी कायमस्वरूपी आतबट्टयातच होता.
डोंगरदऱ्यांत व्यापलेले असले तरी शेकडो हेक्टर विस्तीर्ण सुपीक भूपट्टा लाभलेले धामणी खोरे पाटबंधारे प्रकल्पाअभावी विकासा पासून उपेक्षितच होते. ही उपेक्षा कुठेतरी थांबावी ही लोकांची रास्त मागणी होती. वेळोवेळी या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच मिळाल्या. दीर्घ प्रतिक्षेनंतर १९९६ मध्ये धामणी मध्यम प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. तिथून पुढे प्रकल्प शुभारंभासाठी चार वर्षे प्रतिक्षा करावी लागली. २००० साली धामणी प्रकल्प शुभारंभाचा नारळ फुटला. उभारी घेणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून दोन दशके येथील उजळू पाहणारे भाग्य शासकीय अनास्थेचे पुन्हाही बळी ठरले होते.
अनेक वर्षे सरत होती, पाणीटंचाईचा उद्रेक वाढत होता. वर्षागणिक असह्य होणारी पाणीटंचाई येथील जनआक्रोशाचे कारण ठरली. २०२५ ला प्रकल्पात पाणी अडवायचे यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंददीप नरके यांच्या प्रयत्नांतून मागील चार वर्षे प्रकल्पकामाने गती घेतली होती. गतवर्षी घळभरणी होवून पावसाळ्यात प्रकल्पात प्रथमच १.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचे वितरण, नियोजन याचा आराखडा पाटबंधारे विभागाने केला असून त्याची सुरुवात बंधाऱ्यांत बरगे टाकत पाणी अडवण्यापासून झाली आहे.