

Kolhapur Dam Latest News
म्हासुर्ली: मागील दोन वर्षे धामणी मध्यम प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर चालू होते. दिवाळीत घळभरणी कामास सुरुवात झाली तर पावसाळ्या पूर्वी अपेक्षित घळभरणीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे प्रकल्पात पाणी अडण्याचा क्षण पाहण्याची शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. चोवीस वर्षानंतर या वर्षी प्रथमच धामणी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे. गेले चार दिवस परिसरात संततधार पाऊस चालू असून प्रकल्पातील निर्गमित कक्षेप्रयंत पाणी संचयीत झाले आहे . अतिरिक्त पाणी सांडव्या वरुण वाहू लागले आहे. सध्या लोकांत आनंदाचे वातावरण असून पाण्याअभावी अनेक वर्षे अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांतून हुश्श! एकदाचे सुटलो म्हणत प्रतिक्रिया उमटत आहेत . सांडण्यावरून वाहणाऱ्या पाण्याची पातळी वाढत जाणार आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाकडूनही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सन २००० मध्ये धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. ३.८५ टी. एम.सी. पाणीसाठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक कारणांनी चोवीस वर्ष रखडत गेले. दरम्यानच्या काळात प्रकल्प कामाला गती देण्यासाठी आ. विनय कोरे, माजी आमदार संपतराव पवार पाटील, दिवंगत आमदार पी. एन. पाटील , करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रयत्न केले. तर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रकल्पात पाणी अडवायचेच म्हणून विशेष प्रयत्न केले. सर्वच प्रयत्नांना शासन स्तरावरही चांगले पाठबळ मिळत गेल्याने प्रकल्प कामाने गती घेतली.
या प्रकल्पामुळे पन्हाळा, गगनबावडा व राधानगरी या तीन तालुक्यात विभागलेल्या धामणी खोऱ्यातील चौदाशे हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ पुढील वर्षीपासून शेतकऱ्यांना मिळणार आहे. पाण्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांकडून नदीवर मातीबंधारे बांधण्यासाठी, पाण्याअभावी कोरड्या नदीपात्रात पाणी मिळविण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी जो होणारा लाखोंचा अनाठायी खर्च होता, तो वाचणार आहे. शिवाय एकूणच परिसर हरितक्रांतीच्या छायेत येणार असून सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. सध्या प्रकल्पात १. २९ टीएमसी इतक्या पाण्याचा साठा झाला आहे. सांडव्यापर्यंत ६१७ मीटर इतकी पाणीपातळी झाली आहे.
सध्या प्रकल्पक्षेत्र पर्यटकांना येण्यासाठी निषिद्घ क्षेत्र असले तरी पाणीसाठा झालेला प्रकल्प पाहण्यासाठी लोकांत आतूरता निर्माण झाली आहे. दुरून का होईना प्रकल्पाचे रुप पाहण्यासाठी स्थानिक लोकांचे पाय प्रकाल्याकडे थिरकू लागले आहेत.