

कोल्हापूर: कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमाभागात 'काळा दिवस' पाळणाऱ्या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी आज (दि.१ नोव्हेंबर) सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशील माने बेळगावकडे निघाले होते. मात्र, कर्नाटक प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर रोखले, ज्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तणाव निर्माण झाला.
खासदार माने यांना कर्नाटक पोलिसांनी प्रवेशासाठी अडवताच, त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. "मी एका संवैधानिक पदावर आहे आणि मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशाप्रकारे आम्हाला कोणीही रोखू शकत नाही," असे ठामपणे सांगत माने यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या या कृतीला 'दडपशाही' म्हणत तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी स्पष्ट केले की, ते बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंग (Breach of Privilege) दाखल करणार आहेत. "जोपर्यंत मराठी भाषिकांचा हा लढा यशस्वी होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू," असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अखेरीस, वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेतले. या सर्व घटनेमुळे सीमाभागातील वातावरण तापले असून, या मुद्द्यावर पुढील राजकीय आणि प्रशासकीय प्रतिक्रिया काय येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.