

कोडोली : वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगरावर रविवारी पुजारी आणि परिते येथील भाविकांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली. या प्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात एकूण 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये 16 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत, तर 18 जण अज्ञात आहेत. कॉन्स्टेबल भारत खोमणे-पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी परितेतील विजय ऊर्फ मनोज पाटील, संतोष चंद्रकांत पाटील, अजित आकाराम पाटील, अनिकेत शिवाजी वारकर, सुहास पोपट डोंगळे, दिग्विजय गणपत पाटील, दशरथ महिपती पाटील, संदीप संभाजी भाटवाडे, सोहम शरद मेटे, समर्थ बळवंत पाखर्णीकर, विशाल भोपाल चौगुले, संजय जगन्नाथ चौगुले आदींसह 16, तर वाडी रत्नागिरी येथील गणेश गुरव, सुचित चिखलकर यांच्यासह 18 अज्ञात पुजार्यांचाही समावेश आहे.
रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास श्री काळभैरव मंदिरात पुजारी देवसेवेत व्यस्त होते. त्याच वेळी परितेतील भाविक सासनकाठी नाचवत मंदिर परिसरातून जात होते. यावेळी एकाने गुलाल भरलेली खोबर्याची वाटी पुजार्यांच्या अंगावर फेकली. यामुळे वादाला सुरुवात झाली. पुजार्यांनी संबंधितास समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र वाद चिघळला आणि पुजारी आणि भाविक यांच्यात हाणामारी सुरू झाली.
केदारलिंग देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनीही शांततेत तोडगा निघाल्याचे सांगितले. सोशल मीडियावर या घटनेचे चुकीचे चित्रण झाल्याचा आरोप करत जोतिबा परिसरातील पुजारी आणि व्यापार्यांनी निषेध व्यक्त केला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग आणि हेड कॉन्स्टेबल कुंभार करीत आहेत.
पोलिस बंदोबस्त असताना बराच वेळ गोंधळ
यात्रेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. दक्षिण दरवाजापासून मंदिर परिसरापर्यंत मारामारी सुरू असताना पोलिसांची भूमिका काय होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे.