

कोल्हापूर : विसर्जन मार्गावरील बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, महाद्वार चौक, पापाची तिकटी या मिक्सिंग पॉईंटवर नेहमीच मंडळांमध्ये इर्ष्या आणी चुरस पाहावयास मिळते. यामुळे यंदा प्रथमच मिक्सिंग पाॅईंटवर पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुरुवारी सायंकाळी दिली.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस मैदानावर गुरुवारी पोलिस बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळांसोबत अंमलदारांनी वाद न घातला वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घ्यावे. प्रेशरमीड, लेसर, ड्रोनचा वापर टाळण्यासह ‘टायमर’चे काटेकोर पालन करण्यासाठी ‘पुश स्कॉड’ने लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मंडळाचे कार्यकर्ते, भाविक यांच्यासोबत पोलिसांनी सौजन्याची भूमिका ठेवावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. उपद्रव किंवा पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडळाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून घ्या, अशाही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब पवार उपस्थित होते.
ठिकाण आणि अधिकारी असे...
मिरजकर तिकटी चौकात उपअधीक्षक सुवर्णा पत्की, बिनखांबी गणेश मंदिर चौकात उपअधीक्षक प्रिया पाटील, पापाची तिकटी येथे गृह उपअधीक्षक राजेंद्र मस्के, इराणी खण येथे शाहूवाडीचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा तर पर्यायी मार्गावर गडहिंग्लजचे उपअधीक्षक विवेक पाटील यांची नेमणूक केली आहे. यासोबतच त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व जलदकृती दलाची पथके असतील.