

कोल्हापूर : सर्किट हाऊस... सकाळी सातची वेळ... उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा धडकला... पवार भुदरगड या सूटमध्ये आत गेले... अन् बाहेर अनपेक्षित घडलेल्या घटनेने पोलिसांची धावपळ उडाली... दोन घोडे आत घुसल्याने त्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. अखेर पाठलाग करून पोलिसांनी घोड्यांना बाहेर काढले आणि मोहीम फत्ते केली.
उपमुख्यमंत्री पवार सोमवारी कोल्हापूर दौर्यावर आले. सकाळीच सर्किट हाऊसमध्ये त्यांचे आगमन झाले. त्यांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्तेही स्वागतासाठी आले होते. बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा होता. कडेकोट सुरक्षा होती.
सर्किट हाऊसचा परिसर मोठा असून दाट झाडी आणि गवतही आहे. गवतामध्ये लांब दोन घोडे चरत होते. चरत चरत ते घोडे नेमके उपमुख्यमंत्री पवार यांचा सूट असलेल्या इमारतीजवळ पोहोचले. त्याठिकाणी पोलिसांबरोबरच नागरिकांची गर्दी होती. पवार यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी घोड्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेले घोडे उधळले. सैरभैर पळू लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांचीही पळापळ झाली. काही मिनिटे हा थरार सुरू होता. अखेर पोलिसांनी घोड्यांना बाहेर काढले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि पोलिसांनाही मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, उपमुख्यंत्री पवार यांच्या दौर्यावेळी सर्किट हाऊसमध्ये घोड्यांचा शिरकाव झाल्याने शहरभर चर्चेला उधाण आले. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो झपाट्याने व्हायरल झाले.
सर्किट हाऊस परिसरात कडक पोलिस बंदोबस्त असूनही घोडे थेट सर्किट हाऊसच्या मुख्य इमारतीजवळ कसे आले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरक्षा यंत्रणेत काहीतरी त्रुटी असल्याचे मानले जात आहे. कारण मंत्र्यांच्या बंदोबस्तावेळी बाहेरून कोणत्याही अनधिकृत गोष्टीचा प्रवेश होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. मात्र, घोड्यांचा असा शिरकाव झाल्याने सुरक्षा व्यवस्थेची उणिव उघड झाली आहे.