

कोल्हापूर : पावसाळ्याची चाहूल लागताच विविध साथीचे आजार डोके वर काढू लागतात आणि यात डेंग्यूचा धोका प्रामुख्याने दिसून येतो. एडिस इजिप्ती नावाच्या डासांच्या चावण्यामुळे होणारा हा विषाणूजन्य आजार हाडे मोडणारा ताप म्हणूनही ओळखला जातो; कारण यामुळे रुग्णांना तीव्र अंगदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होतो. डेंग्यूचे गांभीर्य ओळखणे आणि त्यापासून बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; मात्र अनेकदा याबाबत नागरिकांमध्ये माहितीचा अभाव किंवा निष्काळजीपणा दिसून येतो.
डेंग्यूची लागण झाल्यावर साधारणपणे 4 ते 10 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. यामध्ये अचानक थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ होणे, अंगावर लालसर पुरळ किंवा चट्टे येणे ही डेंग्यू तापाची (डीएफ) प्रमुख लक्षणे आहेत. काही गंभीर प्रकरणांमध्ये, ज्याला डेंग्यू हेमोरेजिक ताप (डीएचएफ) म्हणतात, रुग्णाला रक्तस्रावाचा धोका निर्माण होतो. यामध्ये हिरड्यांमधून किंवा नाकातून रक्त येणे, उलटीतून किंवा लघवीतून रक्त पडणे, सतत तहान लागणे आणि तीव्र अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक असते. डेंग्यूचे निदान रक्तातील एनएस 1, आयजीएम आणि आयजीजी या चाचण्यांद्वारे केले जाते.
डेंग्यूचा प्रसार करणारे एडिस डास साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे डेंग्यूला हरवण्यासाठी डासांची उत्पत्तीच रोखणे हा सर्वोत्तम उपाय आहे. घरातील कुलर, फ्रीजच्या खालील ट्रे, फुलदाण्या, कुंड्या आणि इतर पाणी साठणार्या जागा नियमितपणे स्वच्छ कराव्यात. घराच्या आसपास पाणी साठू देऊ नये. टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामी भांडी वेळीच नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात आणि शक्य असल्यास सायंकाळच्या वेळी दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात. अंगावर पूर्ण कपडे घालावेत आणि डास प्रतिबंधक उत्पादनांचा वापर करावा. पावसाळ्यात डेंग्यूचा धोका दुर्लक्षित करून चालणार नाही. प्रशासकीय यंत्रणांसोबतच नागरिकांची जागरूकता आणि सक्रिय सहभागच डेंग्यूला दूर ठेवू शकतो. त्यामुळे, डेंग्यू डासांचं चाललंय मस्त... तुम्ही राहू नका सुस्त! हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
डेंग्यूवर कोणताही विशिष्ट असा थेट उपचार उपलब्ध नाही. लक्षणांनुसार ताप आणि अंगदुखी कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. रुग्णाला पूर्ण विश्रांती आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेटस्ची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते, त्यामुळे त्यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असते. प्लेटलेटस्ची संख्या प्रमाणापेक्षा जास्त घटल्यास बाहेरून प्लेटलेटस् देण्याची गरज भासू शकते. योग्य काळजी घेतल्यास रुग्ण साधारणपणे 3 ते 8 दिवसांत बरा होतो.