

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता.शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पात्र पुन्हा कोरडे पडले असून भर उन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची गरज भागवण्याकरिता नागरिकांना बोर विहिरी कूपनलिका आदींचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातही दूधगंगेचे पात्र कोरडे पडले होते. या दोन महिन्यांत तब्बल २० ते २५ दिवस नदीपात्र कोरडे होते. वारंवार दूधगंगेचे पात्र कोरडे पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.
उन्हाचा तडाका वाढल्याने व तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतातील उभी पिके वाळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. वास्तविक या उन्हाळ्याच्या दिवसात शेतीसाठी आठ ते दहा दिवसांत पाणी देणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती ही क्रमपाळीने येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. नदीपात्रात पाणी असूनही क्रमपाळीत वेळेवर पाणी फिरत नसल्याने पंधरा ते वीस दिवसांनी पाणी मिळत आहे. आता यातच नदीपात्रातील पाणीच संपल्याने क्रमपाळीतील पाणी फिरणार कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक पाण्याअभावी वाळते की काय ? अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन त्वरित दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
हेही वाचा