

जयसिंगपूर : पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. कमी दिवसांत पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. मात्र, कर्नाटकातील हिप्परगी व अलमट्टी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवून ठेवण्यात आल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांवर महापुराचे सावट आहे. उद्याचा महापूर रोखण्यासाठी दोन्ही राज्यांनी आताच ठोस पावले उचलावीत, धरणांचे दरवाजे बंद ठेवून निसर्गाला रोखू नका, असा इशारा शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिला आहे.
सध्या हिप्परगी धरण ९० टक्के भरले असून, ६.५० टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या ६ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र, धरणाच्या २२ दरवाजांपैकी केवळ गेट क्र.6 व 7 या दोनच दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे, १२३ टीएमसी क्षमतेचे महाकाय अलमट्टी धरण जुलैच्या मध्यावरच ९२.५९३ टीएमसी म्हणजेच नियमापेक्षा जास्त भरले आहे.
पाटील म्हणाले, कोल्हापुरातून हिप्परगीपर्यंत पाणी पोहोचायला ३० तास लागतात. जर महाराष्ट्रात अचानक अतिवृष्टी झाली, तर हिप्परगीमधील ६ टीएमसी पाणी एका रात्रीत सोडणे शक्य होणार नाही. कर्नाटक सरकारनेही कृष्णा लवाद व केंद्र शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अलमट्टीची जी पाणी पातळी आहे, तीच हिप्परगीची ठेवावी. त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ आणि पाटबंधारे विभागाने तातडीने बैठक घेऊन पाण्याचा समन्वय साधावा. वेळेपूर्वीच खबरदारी न घेतल्यास आणि कृत्रिम धरणांच्या माध्यमातून महापुराचे संकट ओढावल्यास जनता गप्प बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.