

कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम दि. 31 जानेवारीपर्यंत पूर्ण न केल्यास पुणे - कोल्हापूर महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असल्याने सातारा - कागल महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली असून, सेवा रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. यांची दुरुस्ती तत्काळ करावी. गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव शंभर टक्के सोलरयुक्त करण्यासाठी लागणारा तीन कोटींचा निधी सीएसआर मधून जमा करावा. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतला.
बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., माजी आमदार संजय घाटगे, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, नॅशनल हायवे ऑफ अथॉरिटीचे प्रकल्प संचालक संजय कदम, भैया माने, शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.