

Yalwan Jugai Pavankhind MIDC demand
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई-पावनखिंड पठारावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) होण्यासाठीची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मांजरे (ता. शाहुवाडी) येथे नुकतीच चाळीसहून अधिक गावांच्या सरपंच आणि ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत सर्व गावांमधून एमआयडीसीसाठी एकमुखी निर्णय घेऊन शासनाला पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला.
गजापूरचे सामाजिक कार्यकर्ते आबा वेल्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये अनेक सरपंचांनी एमआयडीसीच्या गरजेबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच संजयसिंह पाटील, ज्ञानदेव वरेकर, सरपंच सत्यवान खेतल, बाजार समिती उपसभापती राजाराम चव्हाण, बाळू पाटील, सरपंच सुशील वायकुळ, करंजफेनचे सरपंच नामदेव पवार, युवराज पाटील, आनंद कांबळे यांच्यासह ४० हून अधिक गावांचे सरपंच उपस्थित होते.
या ठिकाणी एमआयडीसी झाल्यास केवळ शाहुवाडी तालुकाच नव्हे, तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी चालना मिळेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या औद्योगिक वसाहतीमुळे तालुक्यात विकासाचे एक नवे दालन उघडेल आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
एमआयडीसीच्या मागणीसोबतच, आंबर्डे, गावडी, साखरपा, विशाळगड, अनुस्कुरा, पावनखिंड या महत्वाच्या घाट मार्गांचे काम पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून पाठपुरावा करावा, अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली.
शासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन, पावनखिंड-गजापूर या परिसरात एमआयडीसी होण्यासाठी सर्वतोपरीने पाऊले उचलावीत, असे आवाहन या बैठकीतील कमिटीने केले आहे.
या ऐतिहासिक पठारावर MIDC झाल्यास केवळ रोजगाराच्या संधीच मिळणार नाहीत, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार-उदीमाला मोठी चालना मिळेल. शासनाने आमच्या एकमुखी मागणीची तात्काळ दखल घ्यावी आणि विकासाचे हे दार उघडावे."
- आबा वेल्हाळ (सामाजिक कार्यकर्ते, गजापूर)
"MIDC च्या माध्यमातून आपल्या परिसराचा समग्र विकास साधायचा असेल, तर सर्व गावकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हा केवळ शाहुवाडीचा नाही, तर संपूर्ण पट्ट्याचा प्रश्न आहे."
- संजयसिंह पाटील (माजी सरपंच)
"या MIDC मुळे आपल्या परिसरातील शेतीपूरक उद्योगांना आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. स्थानिक संसाधनांचा योग्य वापर होऊन तालुक्याच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडून येईल. सरकारने या संधीचा विचार करून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा."
- ज्ञानदेव वरेकर, सामाजिक कार्यकर्ते