Gokul Milk | वेंकटेश्वरा कंपनीला दिलेल्या 135 कोटींचा हिशेब द्या!

दूध संस्था सभासदांची मागणी
Gokul Milk  |
Gokul Milk | वेंकटेश्वरा कंपनीला दिलेल्या 135 कोटींचा हिशेब द्या!
Published on
Updated on

कोल्हापूर : मुंबई, पुणे येथे टँकरद्वारे ‘गोकुळ’ दुधाचा पुरवठा करणार्‍या वेंकटेश्वरा गुडस् मुव्हर्स या कंपनीला आतापर्यंत 135 कोटी रुपये रक्कम अदा केल्याची माहिती मिळत आहे. संबंधित कंपनी कधीपासून दूध वाहतूक करत होती, टँकरची संख्या, वाहतूक दर, अदा केलेले बिल याची सविस्तर माहिती वर्षनिहाय देण्याची मागणी दूध संस्था सभासदांनी गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात प्रशासक मंडळाकडे केली. मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी सदस्य चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे उपस्थित होते.

‘घरच्यांना फाशी, बाहेरच्यांना अहेर’

‘गोकुळ’मध्ये बेलवाडे यांना तासभर वेळ दिला जातो; मात्र दूध संस्था सभासदांना अधिकार्‍यांची वाट पाहावी लागते. ‘घरच्यांना फाशी आणि बाहेरच्यांना अहेर,’ असा प्रकार सुरू असल्याचा आरोप संस्था सभासदांनी केला. प्रशासक मंडळातील सदस्यांनी जो शेतकरी माहिती मागेल, त्याला ती दिली जाईल, असे सांगितले.

तक्रारदार बेलवाडे यांना पायबंद घाला

गोकुळवर जिल्ह्यातील लाखो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे या ब—ँडला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. एका व्यक्तीमुळे गोकुळमधील वातावरण गढूळ झाले आहे. संबंधित व्यक्तीला (तक्रारदार प्रकाश बेलवाडे) पायबंद घाला. गेली चार वर्षे ही व्यक्ती कुठे होती, निवडणुकीच्या तोंडावर या व्यक्तीला गोकुळचे हित कसे दिसू लागले, असे आक्रमक प्रश्न दूध संस्था सभासदांनी उपस्थित केले.

दूध संस्था सभासदांनी गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात प्रशासक मंडळाला यावेळी चांगलेच सुनावले. येथील वातावरण शांत कसे ठेवायचे, याची जबाबदारी आता

प्रशासक मंडळाची असल्याचे सांगितले. यावर सदस्य मालगावे यांनी नूतन संचालक मंडळ येईपर्यंत गोकुळ आहे त्या स्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यामुळे प्रशासक मंडळाकडून या ब—ँडला कुठेही धक्का लागणार नाही असेच काम होईल, असे सांगितले. यावेळी कृष्णात चौगले, भगवान दिंडे, दत्तात्रय पाटील, राहुल आवळेकर, कृष्णात मेटील, निवास पाटील, संजय दळवी, दिगंबर बाटे आदी उपस्थित होते.

‘गोकुळ’मध्ये सोबत येतील त्यांना घेऊन निवडणूक लढवूया : सतेज पाटील

‘गोकुळ’मध्ये जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणूक लढवूया, असे आवाहन सोमवारी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केले. अजिंक्यतारा कार्यालयात त्यांनी गोकुळमधील काँग्रेसच्या माजी संचालकांसोबत बैठक घेतली. बैठकीमध्ये गोकुळ निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली.

सर्वोच्च न्यायालयाने ‘गोकुळ’ची निवडणूक 90 दिवसांत घ्या, असे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी सहायक निबंधक यांची भेट घेऊन अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुनावणी गतीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तत्पूर्वी त्यांनी अजिंक्यतारा कार्यालयात माजी संचालकांसोबत बैठक घेऊन गोकुळ निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा केली.

‘गोकुळ’ निवडणुकीत सत्ताधारी आघाडीतील किती संचालक सोबत येतील माहीत नाही. तरीही गोकुळची निवडणूक आपल्याला ताकदीने लढायची आहे. यासाठी आतापासूनच कामाला लागा. सध्या चाललेल्या राजकारणाबाबत दूध उत्पादक, संस्था सभासदांमध्ये संताप आहे. गोकुळची आताची निवडणूक दुध उत्पादक विरुद्ध इतर अशी होणार आहे. त्यामुळे गोकुळ वाचविण्यासाठी जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणूक लढूया, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, डॉ. चेतन नरके, अभिजित तायशेटे, अंजना रेडेकर आदी उपस्थित होते.

‘गोकुळ’ची निवडणूक तत्काळ लागेल यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री

गोकुळची निवडणूक तत्काळ लागेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. योग्य समन्वय करू आणि महायुती म्हणूनच लढू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोकुळबाबत बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, 1200 संस्थांची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, न्यायालयाने 90 दिवसांत निवडणूक घ्या, असे आदेश दिले आहेत. यामुळे ही निवडणूक लवकर होईल, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.

सत्तेच्या समीकरणात प्रत्येकाला अधिकार असतो, असे सांगत महायुतीत सुरू असलेल्या वादाबाबत योग्य समन्वय काढला जाईल. गोकुळची निवडणूक ही काहीही झाले तरी महायुतीच म्हणून लढवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत देशाला उद्देशून गेलेल्या भाषणाबाबत आबिटकर म्हणाले, लोकांनी त्यापासून चांगला मॅसेज घेतला तर देशहिताला मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news