Sugarcane Price Demand | उसाला प्रतिटन पाच हजार दर द्या

शरद जोशी विचार मंचचे बेमुदत धरणे आंदोलन; विविध संघटना सहभागी
Sugarcane Price Demand |
Sugarcane Price Demand | उसाला प्रतिटन पाच हजार दर द्या
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्या, या मागणीसाठी शरद जोशी विचार मंचच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात विविध संघटनाही सहभागी झाल्या.

शेतकऱ्याला सध्या महागाईने शेतमाल पिकवणे परवडत नाही. उसाचा उत्पादन खर्च गेल्या सात वर्षांत ७० ते ८० टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, या सात वर्षांत उसाचा दर केवळ २२ टक्के वाढला आहे. याखेरीज तोडणी, वाहतूक खर्चात ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे ऊस शेतीही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामातील ऊस दराबाबत विविध संघटना आंदोलन करत आहेत. मोर्चे काढत आहेत. दर जाहीर होईपर्यंत कारखाने सुरू करू नका, अशी मागणी असताना, साखरेची टंचाई असल्याचे सांगत शासनाने लवकर कारखाने सुरू करण्यास सांगत आहे. यामुळे शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे यंदाच्या गळीत हंगामासाठी पाच हजार रुपये दर द्या, उपपदार्थांनाही चांगला दर मिळाल्याने मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हफ्ता ५२५ रुपये द्या. या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे संभाजीराव चौगुले, ज्ञानदेव पाटील, शिवसेना शेतकरी सेनेचे अध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, सचिव जनार्दन पाटील, किसान मोर्चाचे सचिव भगवान काटे, जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, बाळकृष्ण पाटील, सदाशिव कुलकर्णी, सावकार मादनाईक, शेतकरी-शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील आदी उपस्थित होते.

दर जाहीर न करता कारखाने सुरू केल्यास आंदोलन; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा

​कोल्हापूर : ऊस दर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केल्यास आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना देण्यात आले. वाढत्या महागाईने शेती करणे अत्यंत तोट्याचे ठरत आहे. गेल्या सात वर्षांत उसाचा उत्पादन खर्च भरमसाट वाढला. त्या तुलनेत ऊस दरात नगण्य वाढ झाली. याखेरीज तोडणी-वाहतूक खर्च, मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे उसाचा दर तातडीने जाहीर करावा आणि प्रतिटन ५,००० रुपये पहिली उचल द्यावी, तोपर्यंत कारखाने सुरू करू नयेत. मात्र, साखरेच्या टंचाईचे कारण पुढे करून कारखानदार परस्पर कारखाने सुरू करत आहेत. ‘शुगर केन ॲक्ट १९६६’ आणि शासन परिपत्रकानुसार उसाचा अंतिम दर अद्याप प्रसिद्ध केलेला नाही, त्यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.

सध्या बाजारात साखरेचे दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असून, कारखानदारांना उपपदार्थांमधूनही चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांना उसासाठी पहिली उचल म्हणून किमान ५,००० रुपये मिळणे आवश्यक आहे. यावेळी जिल्हाप्रमुख नामदेव शामराव गिरी, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवन, युवासेना जिल्हा संघटक स्वप्निल मगदूम, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील (हातकणंगले), दत्तात्रय पवार (शाहूवाडी), रवींद्र निंबाळकर (पन्हाळा), उषाताई संजय चौगुले, सुवर्णाताई धनवडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.