

कोल्हापूर : डिलिव्हरी हब स्टोअरमध्ये काम करणार्या डिलिव्हरी बॉयने मित्राच्या मदतीने कंपनीला 2 लाख 7 हजारांचा गंडा घातल्याचे उघडकीला आले आहे. बनावट ग्राहकाच्या नावे मागविलेले दोन महागडे फोन, एअर पॉड आणि अॅपल वॉच घेऊन रिकामे बॉक्स कंपनीला परत पाठवून फसवणूक केली. याप्रकरणी कामगार अभय महेश करणूरकर (रा. सिद्धार्थनगर) व अमिर सोहेल मकानदार (रा. जुना बुधवार पेठ) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अभय करणूरकर हा ताराबाई पार्क येथील फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी हब स्टोअरमध्ये काम करीत होता. 27 फेब—ुवारी ते 15 मे 2025 या काळात त्याने अमिर मकानदार याच्या मोबाईलवरून आकाश पाटील (रा. कोल्हापूर) व मित्तल (रा. कुर्ला मुंबई, सध्या रा. कोल्हापूर) यांच्या नावाने दोन महागडे आयफोन, एक एअर पॉड, एक वॉचची ऑर्डर नोंद केली. ग्राहकांना वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय त्यांनी बुकिंगवेळी निवडला होता.
ऑर्डर केलेल्या वस्तू कंपनीच्या स्टोअरमध्ये येताच करणूरकर याने डिलिव्हरीसाठी त्या ताब्यात घेतल्या. त्यातील वस्तू काढून घेतल्या. पार्सल पुन्हा पॅक करून संबंधित ग्राहक सापडत नाहीत, असे कारण देत चारही वस्तूंचे पार्सल स्टोअरमध्ये जमा केले. कंपनीच्या तपासणीत हा प्रकार उघडकीला आला. कंपनीचे अधिकारी प्रकाश रतिलाल शहा (रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.