

डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. पराभवानंतर काही उमेदवारांमध्ये नैराश्य पसरले असून, त्यांच्या समर्थकांकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडे शिष्टमंडळे पाठवून दबाव टाकला जात आहे. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडे इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा चुरशीच्या लढतीत ही निवडणूक पार पडली. ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या निकषावर उमेदवार देताना अनेक इच्छुकांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्यामुळे तिन्ही प्रमुख पक्षांत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. काहींनी बंडखोरी केली, तर काहींनी नेत्यांकडून आश्वासन घेऊन माघार घेतली होती. आता हेच नाराज उमेदवार स्वीकृत नगरसेवकपदासाठी हट्ट धरू लागले आहेत.
महापालिकेत एकूण 81 नगरसेवक असून, दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक असा नियम आहे. विद्यमान संख्याबळानुसार काँग्रेसकडे 35 नगरसेवक असल्याने त्यांना तीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार आहे. भाजपकडे 26 नगरसेवक असून, त्यांना दोन, तर शिवसेनेला एक स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा कोटा आहे. मात्र, इच्छुकांची संख्या या कोट्यापेक्षा कितीतरी अधिक असल्याने स्पर्धा तीवव्र झाली आहे.
पराभूत उमेदवारांचा वाढता दबाव
काही उमेदवार अत्यंत कमी मतांनी पराभूत झाले आहेत. हे उमेदवार आणि त्यांचे समर्थक ‘पराभव केवळ योगायोगाने झाला’ असा युक्तिवाद करत, स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची मागणी करत आहेत. परिणामी, नेत्यांवर दबाव वाढत असून, संधी नेमकी कोणाला द्यायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. प्रत्येक इच्छुक आपलाच दावा पुढे रेटत असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
नाराजी पुन्हा उफाळण्याची शक्यता
स्वीकृत नगरसेवकपदासाठी पराभूत उमेदवारांचा आग्रह वाढत असताना, निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून आश्वासन घेतलेले काही इच्छुक पुन्हा नाराज होण्याच्या मार्गावर आहेत. पराभूत उमेदवारांनाच उमेदवारी आणि स्वीकृत नगरसेवकपद दोन्ही दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही नाराजी ओढवून घेण्याची जोखीम नेते पत्करणार का, याबाबत साशंकता असून, स्वीकृत नगरसेवक निवड करताना पराभूत उमेदवारांना डावलले जाईल की संधी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.