मुश्रीफ यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली

संजय मंडलिक, संजय घाटगे यांचे प्रतिपादन
Dedication and inauguration of development works in Mauje Sangaon
मौजे सांगाव : येथे विकासकामांच्या प्रारंभ प्रसंगी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, संजय घाटगे समोर उपस्थित जनसमुदाय. Pudhari File Photo
Published on
Updated on

कसबा सांगाव : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या पाच वर्षांत विकासाची गंगा कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघांत आणली. विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन माजी खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. मौजे सांगाव (ता. कागल) येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, निवडणुकीत मला डोळे झाकून मतदान करू नका, तुम्ही सातत्याने दिलेल्या संधीत मी सर्वसामान्यांचे हित साधण्याचे काम प्रामाणिकपणे करू शकलो आहे की नाही? विरोधकाला त्रास देऊन संधी शोधणार्‍या प्रवृत्तीविरोधात माझी लढाई आहे. त्यात तुम्ही मला साथ द्याल, हा विश्वास आहे. घाटगे-मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून त्यांचे पांग फेडीन.

संजय घाटगे म्हणाले, ज्या कार्यकर्ते, सर्वसामान्यांनी मला पंचवीस वर्षे सत्तेशिवाय साथ दिली त्यांचे हित कोण करू शकतो, हे मी जाणले आहे म्हणून मुश्रीफांची साथ आयुष्याच्या शेवटपर्यंत कायम ठेवीन. संजय मंडलिक म्हणाले, महायुती म्हणून मी कायम त्यांच्या सोबतच आहे. त्यामुळे वेगळ्या विचाराचा विषय नाही. त्यांना विक्रमी मताधिक्य देण्यात आमचा सिंहाचा वाटा राहील.

युवराज पाटील, जिल्हा बँक संचालक भय्या माने, बाबगोंडा पाटील यांचे भाषण झाले. सजवलेल्या ट्रॉलीतून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्वागतासाठी हत्ती ही आणला होता. सुळकूड, कागल, सिद्धनेर्ली येथील बाबगोंडा पाटील, बाळू लाड, अमर पाटील, संजय पाटील, दत्तात्रय पवार या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वाय. बी. पाटील, नारायण पाटील, विकास पाटील, शशिकांत खोत, राजेंद्र माने, सरपंच विजयसिंह पाटील, किरण पास्ते आदींसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. कृष्णात पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एन. डी. पाटील यांनी आभार मानले.

बक्षिसीसाठी तडजोडी केल्या नाहीत

संजय घाटगे म्हणाले, जिल्हा बँकेत संचालक पदाची संधी ही मुश्रीफांच्या पाठिंब्यांची बक्षिसी नाही. मी पदासाठी कोणत्या तडजोडी आयुष्यात केल्या नाहीत. त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आजपर्यंत मला सांभाळले.

मुश्रीफांना कायद्याचे ज्ञान वकिलापेक्षा जास्त : मंडलिक

संजय मंडलिक म्हणाले, ‘वकील से जादा, जज से थोडा कम’ असे कायद्याचे ज्ञान मंत्री मुश्रीफांना आहे. त्यामुळेच त्यांनी विविध मंत्रिपदांच्या काळात सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय कायद्यात रूपांतरित केले. त्यामुळे कायद्याच्या सक्तीने गोरगरिबांना योजनांचा फायदा झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news