

कोल्हापूर ः राज्यात मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले तरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे पालकमंत्री कोण याचा तिढा कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मात्र पालकमंत्री कोण याचा निर्णय झालेला नाही. हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर की चंद्रकांत पाटील, असा तिढा कायम आहे.
गेली सुमारे दीड वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे होते. यापूर्वी 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मात्र मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची इच्छा अपूर्णच राहिली. मुश्रीफ कॅबिनेट मंत्री असूनही पालकमंत्रिपदाची संधी तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मिळाली. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली.
आता राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. जिल्ह्यात दहाच्या दहा आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. मंत्रिपदासाठी शिंदे शिवसेनेत तीन आमदारांमध्ये जोरदार लॉबिंग झाले. मात्र प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळाले. राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके हे नाराज झाले. राजेश क्षीरसागर यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. अजित पवार गटातून एकमेव आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली.
चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर कोल्हापूर दौर्यावर आले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘पालकमंत्री... पालकमंत्री...’ अशा घोषणा दिल्या. त्यावर पाटील यांनी त्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद आपल्याकडे असावे, असे भाजप नेत्यांना वाटते. भाजपचे राज्यसभेचे एक खासदार व दोन आमदार जिल्ह्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आल्यास जिल्ह्याच्या सत्तेवर आपले वर्चस्व राहील, अशी त्यांची भूमिका आहे.
आता पालकमंत्री कोण याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद कोणाकडे याला राजकीय वर्तुळात महत्त्व आहे. शिंदे शिवसेनेकडे तीन आमदार असल्याने त्यांचा पालकमंत्रिपदासाठी आग्रह आहे तर ज्येष्ठतेच्या जोरावर मुश्रीफ यांची मागणी कायम आहे.