Gokul Election | हरकत घेतलेल्‍या ६७७ दूध संस्‍थांचा निकाल प्रलंबित

उर्वरित दूध संस्‍थांना आज पाठविणार निकाल
Gokul Election |
Gokul Election |
Published on
Updated on

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’च्‍या प्रारूप मतदार यादीतील हरकत घेतलेल्‍या ६७७ दूध संस्‍थांचा निकाल प्रलंबित ठेवला जाणार आहे. या संस्‍थांची न्‍यायालयात सुनावणी सुरू असल्‍याने निकाल राखून ठेवणार आहेत. न्‍यायालयाच्‍या निकालानंतरच या संस्‍थांचा यादीत समावेश करण्‍याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तर उर्वरित दूध संस्‍थांना सोमवारी (दि. ३१) निकालपत्र पाठविले जाणार आहे.

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी ४,८९७ दूध संस्‍थांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली. यानंतर न्‍यायालयाने आणि विभागीय उपनिबंधक यांनी अवसायनातील दूध संस्‍थांचा अवसायनाचा आदेश रद्द केल्‍याने आणखी ४९२ दूध संस्‍थांचा यादीत समावेश करण्‍यात आला. प्रारूप यादीवर ५९५ हरकती आल्‍या असून, यामधून १,७४० दूध संस्‍थांवर आक्षेप नोंदविले. हरकतींवर विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांनी सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली असून, आज निकाल दिला जाणार आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने १० ऑक्‍टोबरपर्यंत ‘गोकुळ’ची निवडणूक पूर्ण करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्‍याचे आव्‍हान दुग्‍ध विभागासमोर आहे. दूध संस्‍थांची सुनावणी पूर्ण झाल्‍यानंतर गेली चार दिवस सुट्टी दिवशीही निकाल पत्र तयार करण्‍याचे काम सहायक निबंधक कार्यालयात सुरू आहे. रविवारीही रात्री उशिरापर्यंत अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकडून निकालपत्र तयार करण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सोमवारी कार्यालयीन वेळेेत संबंधित संस्‍थांना निकाल पाठविले जाणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्‍तीचा प्रस्‍ताव आज होणार सादर

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्‍तीचा प्रस्‍ताव जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक नारायण परजणे आज राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे सादर करणार आहेत. प्राधिकरणाकडून प्रस्‍तावाची मागणी करण्‍यात आली आहे. प्रारूप यादीवरील हरकतींचा निकाल सोमवारी दिला जाणार आहे. यानंतर ४ सप्‍टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्‍पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्‍त होण्‍याची शक्‍यता आहे. नियुक्‍तीनंतर संबंधित अधिकारी ‘गोकुळ’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. साधारणत: १५ सप्‍टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याच्‍या प्रक्रियेला सुरुवात होईल.

सहकार न्‍यायालयात ४१० दूध संस्‍थांची आज सुनावणी

कोल्हापूर : सहकार न्‍यायालयात सोमवारी (दि. ३१) ४१० दूध संस्‍थांची सुनावणी होत आहे. ‘गोकुळ’च्‍या मतदार यादीतील समावेशासाठी न्‍यायालयाचा निकाल महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. त्‍यामुळे न्‍यायालय काय निर्णय देणार याकडेही संस्‍था प्रतिनिधींचे लक्ष लागून आहे. तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी ‘गोकुळ’ने ४१० दूध संस्‍थांना चुकीच्‍या पद्धतीने सभासदत्त्‍व दिले आहे. त्‍यामुळे संस्‍थाचे सभासदत्त्‍व रद्द करावे, अशी याचिका सहकार न्‍यायालयात दाखल केली असून, सुनावणी सुरू आहे. दरम्‍यान, याच संस्‍था ‘गोकुळ’च्‍या प्रारूप यादीत असून, त्‍यांच्‍यावर हरकत घेतली आहे. हरकतीवर सुनावणीदेखील पूर्ण झाली आहे. मात्र, न्‍यायप्रविष्‍ठ बाब असल्‍याने या संस्‍थांचा निकाल विभागीय उपनिबंधक राखून ठेवणार आहेत. त्‍यामुळे या दूध संस्‍थांच्‍या यादीतील समावेशाचे भवितव्‍य सहकार न्‍यायालयाच्‍या निकालावर ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news