

गारगोटी : पिंपळगाव येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला असून सुमारे 12 लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाटील गल्लीतील रघुनाथ दत्तात्रय पाटील यांचे कुटुंबीय कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. याचा फायदा घेत चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट फोडून त्यामधील 15 हजार रुपयांची रोकड तसेच साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये सव्वातीन तोळ्यांचे गंठण, सव्वादोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, दीड तोळ्याचा नेकलेस, साडेसहा ग्रॅम वजनाची कर्णफुले आणि पाच ग्रॅमची ठूशी यांचा समावेश आहे. तसेच सहा भाराचे चांदीचे पैंजण व अडीच भाराचा चांदीचा छल्ला असा चांदीच्या दागिन्यांचाही ऐवज चोरीस गेला.
घरी परतल्यानंतर पाटील कुटुंबीयांना घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. पाहणी केली असता कपाट फोडून रोकड व दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती तत्काळ भुदरगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात येत आहे.