

कोडोली : पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील जावेद अब्दुल आंबी यांचे भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
जावेद आंबी व पत्नी एमआयडीसी येथे कामासाठी गेले होते. पुतण्या साकिब सकाळी अकराच्या दरम्यान कामानिमित्त बाहेर जाताना त्याने दरवाजाला फक्त कडी लावून गेला. चोरट्याने तीन तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याचे लहान गंठण, दीड तोळ्याचा नेकलेस, अर्ध्या तोळ्याचे कानातील वेल व एक तोळ्याची गलसुरी माळ असे दागिने लंपास केले. सायंकाळी कामावरून परत आलेल्या जावेद व त्यांची पत्नी शबनम यांना चोरी झाल्याचे समजले. कोडोली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
जावेद व त्यांची पत्नी शबनम या दोघांनी मोलमजुरी करून कमवलेले दागिने चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याने शबनम यांनी केलेला आक्रोश उपस्थित महिलांच्या डोळ्यांतून अश्रू आणणारा होता. अधिक तपास पो. नि. कैलास कोडग करीत आहेत.