

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या व नवीन नगरपालिका पाठीमागे अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी भरदिवसा घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी दोन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ३ लाख ४० हजारांची रोकड असा तब्बल २५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
नगरपालिकेच्या नवीन इमारतीमागे 'श्री राम संकुल' अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर बाळासो भोजगी व गोविंदराव पटेल यांचे शेजारी-शेजारी फ्लॅट आहेत. भोजगी हे पत्नीच्या उपचारासाठी गुरुवारी दुपारी सांगली येथील रुग्णालयात गेले होते, तर पटेल हेही घराला कुलूप लावून जवळच असलेल्या आपल्या दुकानात गेले होते. दोन्ही घरे बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी भोजगी यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी बेडरूममधील कपाट फोडून १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपयांची रोकड चोरली. यानंतर चोरट्यांनी लगतच्या पटेल यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील ४० हजारांची रोकड लांबवली.
अपार्टमेंटमधील नागरिकांना दोन्ही घरांचे दरवाजे उघडे दिसल्याने त्यांनी भोजगी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी पोलिस अधीक्षक ज्ञानेश गवई यांच्यासह पोलिस पथक रात्री उशिरापर्यंत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत होते. रात्री उशिरा तपासासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.