दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा
दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीवरील महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा दत्तवाड एकसंबा बंधारा चालू वर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर अधिक अंतराने प्रवास करावे लागणार आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या संततदार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी वाढले आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचे पाणी वाढल्याने दत्तवाड एकसंबा बंधारा चालू पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पंधरा ते वीस दिवस पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतल्याने दूधगंगा नदीचे पाणी पूर्णपणे पात्रात गेले होते.
मार्च-एप्रिल मध्ये असणाऱ्या उन्हाप्रमाणे ऑगस्टमध्येही उन्हाळा जाणवत होता. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागली होती. अनेक शेतकऱ्यांनी आपली पाण्याची विद्युत मोटारी पुन्हा जोडू लागले होते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नदीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे या विद्युत मोटारी पुन्हा सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.