

दर्शन वडेर
नृसिंहवाडी : "वाट वळणाची.. जीवाला या ओढी.. दिसते समोर नरसोबाची वाडी.." या ओळींची अनन्य अनुभूती गुरुवारी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आली. कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमतीर्थावर भक्तीचा महापूर ओसांडून वाहत होता. 'दिगंबरा दिगंबरा.. च्या अखंड जयघोषात सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक अभूतपूर्व गर्दी यंदा दत्त जयंतीनिमित्त झाली होती. महाराष्ट्र तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशसह देशभरातून अंदाजे सहा ते सात लाख भाविक आले होते.
पहाटे तीन वाजल्यापासून कडाक्याच्या थंडीतही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. कृष्णातीरावरील अष्टतीर्थांच्या साक्षीने सोहळ्याला दिव्यतेचा आगळा रंग प्राप्त झाला. काकड आरती, षोडषोपचार पूजा, अभिषेक सेवा झाल्यानंतर दुपारी श्रींच्या चरणपादुकांवर महापूजा करण्यात आली. यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूपात रेखीव पानपूजा बांधण्यात आली. पवमान पंचसुक्तांची आवर्तने झाल्यावर सायंकाळी साडे चारच्या सुमारास उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात आली.
सूर्य अस्तमानाला जात असतानाच दत्ततत्व प्रकटल्याची अनुभूती भाविकांनी घेतली. चांदीच्या पाळण्यात त्रिमूर्ती रूपातील श्रीफळांवर अबीर फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी 'उद्धरी गुरुराया..' हा पारंपरिक पाळणा व आरत्यांचे गायन करण्यात आले. यावेळी करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांची उपस्थिती लाभली. जन्म काळानंतर मानकरी विनोद पुजारी यांच्या निवासस्थानी पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला. तेथे सुद्धा भाविकांनी गर्दी केली होती. रात्री धूप दीप आरती झाल्यानंतर पालखी सोहळा संपन्न झाला. शेजारतीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली.
दत्त देवस्थान समिती व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे चोख नियोजन करण्यात आले होते. देवस्थान समितीने भाविकांसाठी दर्शन रांगांचे नियोजन, भव्य शामियाना, महाप्रसाद व्यवस्था, सूचनाफलक व्यवस्था ठेवली होती. ग्रामपंचायतीकडून पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, शिस्तबद्ध वाहतूक नियोजन, गर्दी व्यवस्थापन केले. पोलिसांनी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते. एस. टी. महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी जादा ६० बसेसची सोय करत एकूण ९१ बसेस उपलब्ध केल्या होत्या. भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थान, ग्रामपंचायत, पोलिस, सेवाभावी संस्था, वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मीचे जवान कार्यरत होते. सोहळा यशस्वी होण्यासाठी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव गजानन गेंडे, सरपंच चेतन गवळी, धनाजीराव जगदाळे, अनघा पुजारी, रमेश मोरे, ग्रामसेवक हेमंत कोळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पहाटेपासूनच मोठी गर्दी.. पार्किंग हाऊसफुल
पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांनी नृसिंहवाडीत मोठी गर्दी केली. यामुळे नृसिंहवाडीतील सर्वच रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. पार्किंग व्यवस्था हाऊसफुल झाली होती. गर्दीचा ओघ रात्री उशिरापर्यंत तसाच होता. बंदोबस्तासाठी कोल्हापूर पोलिस दलातील जादा पोलिस तैनात करण्यात आले होते. इतक्या प्रचंड गर्दीतही दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सर्व विभाग दक्ष..
दत्त जयंतीच्या यशस्वीतेसाठी सकाळपासूनच तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्यासह प्रशासन तळ ठोकून होते. जिल्हा पातळीवरून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल येडगे माहिती घेत होते. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन , महसूल विभागासह सर्वच विभागांनी चोख भूमिका निभावली.