

सुनील सकटे
कोल्हापूर : राज्यात अल निनोमुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान खात्याने दिलेले स्पष्ट संकेत या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असून सिंचनासाठी पाणी उपसाबंदी लागू केली आहे. याबाबतचा आदेश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी दिले. त्यामुळे उपलब्ध पाणी नागरिकांनी काटकसरीने वापरावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
जलसंपदा विभागाने राज्यातील सिंचनाच्या पाणी उपशावर बंदी घातली आहे. पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत आदेश लागू असून दर आठवड्यास अहवाल सादर करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अखंड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिंचनासाठी प्रस्तावित अथवा सुरू असलेली पाणी आवर्तने तत्काळ बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या जलसाठ्याचा इतर कोणत्याही कारणासाठी वापर होऊ नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासणी व गस्त घालण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जलसंपदा विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस, महसूल, जलसंपदा विभागाची संयुक्त गस्त पथके
धरणांसह नद्यांमधील बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी पोलिस, जलसंपदा आणि महसूल विभागाची संयुक्त पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या पथकांमार्फत गस्त घालण्यात येणार असून बेकायदेशीर पाणी वापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.