kolhapur | नेत्यांसमोर ‘डॅमेज कंट्रोल’चे आव्हान

damage control challenge for leaders
kolhapur | नेत्यांसमोर ‘डॅमेज कंट्रोल’चे आव्हान
Published on
Updated on

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील एकेका जागेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात नाराजी पसरणार आहे. ही नाराजी योग्यवेळी हाताळली नाही, तर अधिकृत उमेदवाराच्या विजयाच्या शक्यतेवर मोठा परिणाम करणारी ठरू शकते. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बंडखोरी, अपक्ष उमेदवारी किंवा गुप्त विरोध हा अनेकदा निकालावर निर्णायक ठरतो. परिणामी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आदी पक्षांतील उमेदवार जाहीर करण्यापेक्षा आता ‘डॅमेज कंट्रोल’ हेच सर्व नेत्यांसमोरचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अक्षरशः कंबर कसली आहे. ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची, तर काही नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे तुल्यबळ, सक्षम आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेलेच ‘तगडे’ उमेदवार मैदानात उतरवण्यावर पक्षांचा भर आहे. एकेक उमेदवाराची जातीय गणिते, आर्थिक ताकद, सामाजिक संपर्क, संघटनात्मक पकड, मागील निवडणुकांतील कामगिरी, तसेच संभाव्य बंडखोरीची शक्यता अशा सर्व बाजूंनी तावून-सुलाखून तपासणी करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाली. काँग्रेसने सर्वप्रथम आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत राजकीय रणधुमाळीला औपचारिक सुरुवात केली. त्यानंतर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही उमेदवार अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक आहेत, तरीही याद्या जाहीर केलेल्या नाहीत. याद्या जाहीर होताच अनेक प्रभागांत समाधानासोबतच नाराजीचा सूरही स्पष्टपणे उमटू लागले आहेत.

बहुतांश प्रभागांमध्ये प्रत्येक पक्षाकडून पाच ते सहा इच्छुक उमेदवार मैदानात होते. प्रत्येक इच्छुकाला आपलीच उमेदवारी पक्की असल्याचा ठाम विश्वास होता. अनेकांनी पक्षासाठी वर्षानुवर्षे काम केल्याचा, सामाजिक कार्याचा, आर्थिक मदतीचा, तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता असल्याचा दावा केला. मात्र, शेवटी पक्ष नेतृत्वाला प्रत्येक प्रभागातून एकाच उमेदवाराची निवड करावी लागली. परिणामी, निवड न झालेल्या इच्छुकांमध्ये तीव— नाराजी पसरली असून ती उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे.

महापालिका निवडणूक ही केवळ पक्षांमधील नाही, तर पक्षांतर्गत लढतींचीही साक्षीदार ठरणार आहे. उमेदवार निवड हा पहिला टप्पा होता; आता नाराजी दूर करून सर्वांना एकत्र बांधणे, ही खरी कसोटी आहे. जो पक्ष आणि जे नेते हे डॅमेज कंट्रोल प्रभावीपणे करू शकतील, त्यांनाच महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवण्याची खरी संधी मिळणार आहे. काँग्रेसमध्ये आमदार सतेज पाटील यांच्यावर जबाबदारी आहे. कोल्हापुरात काँग्रेसची पारंपरिक ताकद आहे. इच्छुकांची मोठी संख्या ही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, काही ठिकाणी बंडखोरीची भाषा सुरू आहे. ही नाराजी शांत करण्यात सतेज पाटील यांची कसोटी लागणार आहे.

आ. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुतांश प्रभागांत ताकदवान उमेदवार दिले असले, तरी अनेक जुने कार्यकर्ते उमेदवारीपासून वंचित राहिले आहेत. शिवसेनेत संघटनात्मक काम करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. हा असंतोष वेळेत आवरला नाही, तर प्रचारात उदासीनता, गुप्त विरोधाच्या रूपाने समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपमध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोरही तितकेच कठीण आव्हान आहे. भाजपची शहरातील ताकद मागील काही वर्षांत वाढली असली, तरी उमेदवारीच्या वेळी अनेक ठिकाणी तीव— स्पर्धा झाली. काही प्रभागांत उमेदवार निवडीवरून थेट टीका होताना दिसत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर वाढल्यास त्याचा थेट परिणाम मतांवर होऊ शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक अनुभवी, तर काही नव्या चेहर्‍यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता. उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांतून उघड नाराजी व्यक्त होऊन काही ठिकाणी अपक्ष लढण्याची चर्चा सुरू आहे. मंत्री मुश्रीफ यांना आपल्या अनुभवाचा वापर करून ही नाराजी शमवावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news