

प्रवीण ढोणे
राशिवडे : गव्यांसाठी राखीव असणारे राधानगरी तालुक्यातील दाजीपूरचे अभयारण्य आता गव्यांना असुरक्षित वाटत आहे. अभयारण्यामध्ये गव्यांना आवश्यक असणार्या अन्नाचा तुटवडा भासत असल्याने व मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे गवे सैरभैर होऊन मानवी वस्त्यांकडे सुसाट सुटले आहेत. यामुळे भय निर्माण झाले असून शेतीचेही प्रचंड नुकसान होत आहे.
दाजीपूरचे अभयारण्य नेहमीच पर्यटकांना खुणावत असते; पण गवत व पाण्याची कमतरता, वाढता मानवी हस्तक्षेप, खाण्याच्या बदललेल्या पद्धती आदी अनेक कारणांमुळे ते असुरक्षित बनत आहे. त्यामुळे गवे जंगलाबाहेर पडून मानवी वस्तीकडे किंवा पिकांकडे वळत आहेत. त्यातून गवे व मानव असा संघर्ष वाढत चालला आहे. वनांमध्ये वाढणारी मानवी घुसखोरी, विकास कामे आणि अतिक्रमण यामुळे गव्यांना धोका निर्माण होतो. जंगलातील नैसर्गिक गवताचे प्रमाण कमी होऊन झुडपे वाढतात, ज्यामुळे खाणे आणि पर्यावरणावर परिणाम होतो. त्यातून गव्यांचे कळप पिकांची नासधूस करतात, ज्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. नैसर्गिक अधिवासस्थाने अपुरी पडत आहेत, ज्यामुळे कळपाकळपाने गवे अभयारण्याबाहेर पडत आहेत.
बिथरलेले गव्यांचे कळप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांवर विशेषत: शेतकर्यांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. त्यान नागरिक जखमी होणे, जायबंदी होण्यासह काहींचे जीवही जात आहेत. काही ठिकाणी गवेही विविध कारणांनी मृत्युमुखी पडत आहेत. सध्या गवत कापणी, ऊसतोडीसह शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रामुख्याने गवे अभयारण्यामधून बाहेर पडू नयेत, यासाठी उपाययोजना राबविणे महत्त्वाचे आहे.
शासनाच्या योजना पाण्यात
जंगली जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात; परंतु वनांमध्ये जाण्यास परवानगी नसल्यामुळे कामे केली की नाहीत, याची माहिती समोर येत नाही. दाजीपूरमध्ये पाण्याचे अनेक झरे आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असते. त्यासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये पैसा जिरविला जातो; परंतु प्राण्यांना पाणी काही दिसत नाही. परिणामी, पाण्याच्या शोधातदेखील गवे बाहेर पडू लागले आहेत.