

Dr Pratapsinh Jadhav Birthday
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा 80 वा वाढदिवस सहस्रचंद्रदर्शन सोहळा म्हणून साजरा होत आहे. बुधवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथे हा दिमाखदार सोहळा साजरा होणार आहे. अनेक आंदोलनांचे नेतृत्व करणारे व कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत आग्रही असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. जाधव यांचा हा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय ‘पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी सत्कार सोहळा समिती’ने घेतला आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरात या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून सर्वत्र डॉ. जाधव यांच्या कार्याचे दर्शन घडविणारे फलक लावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्य सरकारमधील कॅबिनेट व राज्यमंत्री या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार भूषविणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी गौरव सत्कार समितीचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले आहे.
या दिमाखादार सोहळ्यासाठी पोलिस परेड मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर निमंत्रितांसाठी सुसज्ज अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या समारंभासाठी महासैैनिक दरबार हॉल व त्याच्या समोरील जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महासैनिक दरबार हॉलच्या प्रांगणातूनच पोलिस परेड ग्राऊंडवर जाण्यासाठी विशेष रस्ता तयार करण्यात आला आहे. याच ठिकाणाहून प्रवेश दिला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी येणार्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताकरिता त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर तसेच शहरात स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहरात सर्वत्र या कार्यक्रमाचे फलक लावण्यात आले आहेत.