

कोल्हापूर : पत्रकारितेचा समृद्ध वारसा जपत जनसामान्यांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडत नि:पक्षपणे गेली 87 वर्षे जनतेशी अकृत्रिम प्रेमाचे नाते जपलेला दै. ‘पुढारी’ 87 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून 88 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त गुरुवार, दि. 1 जानेवारी या नववर्षदिनी येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या टाऊन हॉलच्या निसर्गरम्य हिरवळीवर सायंकाळी 5 वाजल्यापासून स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह तमाम जनतेच्या उपस्थितीने हा स्नेहमेळावा रंगणार आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा तमाम जनतेच्या प्रेमवर्षावात नुकताच साजरा झाला असून, या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’च्या 88 व्या वर्षातील पदार्पणाच्या सोहळ्याला आगळे महत्त्व आहे.
‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. ‘मीडिया अंडर वन रूफ’ याप्रमाणे पुढारी दैनिक, पुढारी एफ.एम. रेडिओ, पुढारी आऊटडोअर मीडिया, पुढारी वेब, पुढारी डिजिटल व पुढारी न्यूज चॅनल अशा मीडियाच्या सर्व अंगांनी ‘पुढारी’ जनतेच्या सेवेत अहोरात्र कार्यरत आहे. तंत्र कितीही बदलले, तरी निर्भीड, नि:पक्ष पत्रकारितेचा वसा जपणाऱ्या ‘पुढारी’ने जनमानसावरील गारूड या बदलत्या माध्यमातूनही कायम राखले आहे.
यामागे स्वातंत्र्यलढ्यातील ‘पुढारी’ची अग्रणी भूमिका, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कठोरपणे घेतलेली भूमिका, रस्त्यावर उतरून केलेले आंदोलनांचे नेतृत्व, यातून “पुढारी’ म्हणजे कोल्हापूर, वृत्तपत्र म्हणजे ‘पुढारी” हे समीकरण दृढ झाले आहे. आपल्या प्रश्नांवर सतत आवाज उठविणाऱ्या ‘पुढारी’चा वर्धापन दिनाचा सोहळा हा कोल्हापूरच्या जनतेचा सोहळा ठरला आहे. या आनंद सोहळ्यात तमाम कोल्हापूरकर, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीची मंडळी ही आपल्या घरचाच कार्यक्रम असल्याचे सांगत सहभागी होतात, हे या स्नेहमेळाव्याचे वेगळेपण आहे.
वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पुढारी’च्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे; तर स्नेहमेळाव्यासाठी टाऊन हॉलमध्ये सजावट करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या स्नेहमेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.